सुविधेचा अभाव असलेल्या ग्रामीण भागात मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांची धाडसी कामगिरी ; हृदयाभोवती साचलेले १.५ लिटर द्रव काढून वाचवला ३५ वर्षाय रुग्णाचा जीव ...
आवश्यक साधनांचा अभाव असतानाही डायलिसिस कॅथेटरचा वापर करत केले यशस्वी उपचार ; मृत्यूशी झुंज देणाऱ्या क्षयरोगाच्या रुग्णाला मिळाले नवजीवन


नवी मुंबई / प्रतिनिधी : - ग्रामीण भागात अत्यावश्यक सुविधा नसतानाही नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका ३५ वर्षीय क्षयरोग (TB) रुग्णाचा जीव वाचविण्यात यश आले आहे. हृदयाभोवती मोठ्या प्रमाणात द्रव साचल्याने (पेरिकार्डियल इफ्युजन) गंभीर स्थितीत असलेल्या या रुग्णावर डायलिसिस कॅथेटरचा वापर करून यशस्वी उपचार करण्यात आले.

रोहा तालुक्यातील आदिवासी पाड्यातील हा रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेत ओपीडीमध्ये दाखल झाला. तपासणीत ‘पेरिकार्डियल इफ्युजन’ (हृदयाभोवती द्रव साचणे) आणि ‘कार्डियाक टॅम्पोनाड’ (हृदयावर दबाव येणे) असल्याचे स्पष्ट झाले. या स्थितीत तातडीने द्रव काढणे आवश्यक होते, अन्यथा रुग्णाचा मृत्यू होऊ शकत होता. 

रुग्ण श्री मनोहर पवार हे क्षयरोगाशी संबंधित गुंतागुंतींमुळे अत्यंत अशक्त झाले होते. त्यांना श्वास घेण्यास तीव्र त्रास होत होता, रक्तदाब कमी झाला आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. रोहा परिसरात ७०–८० किमी अंतरावरही कार्डियाक सेंटर किंवा कॅथलॅब उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली होती.

सुरुवातीला रुग्णाला संवेदन नर्सिंग होम येथे दाखल करण्यात आले, जिथे रोहा येथी डॉ. मनीष वैरागी (मधुमेह तज्ज्ञ व जनरल फिजिशियन) यांनी तातडीने उपचारास सुरुवात केली त्यानंतर काही दिवसांनी रुग्णाला मेडिकव्हरच्या आउटरीच ओपीडीत जाण्याचा सल्ला दिला. तिथे डॉ. अनुप महाजनी (कार्डिओलॉजिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर) यांनी तातडीने २डी इकोकार्डिओग्राफी करून हृदयाभोवती जवळपास १.५ ते २ लिटर द्रव साचल्याचे निदान केले.

साधारणपणे ही प्रक्रिया कॅथलॅबमध्ये विशेष उपकरणांसह केली जाते. मात्र, त्या ठिकाणी अशी कोणतीही सुविधा नसताना डॉ. महाजनी यांनी डायलिसिस कॅथेटरचा वापर करून ‘पेरिकार्डिओसेंटेसिस’ ही प्रक्रिया केली. अल्ट्रासाऊंडच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काळजीपूर्वक १.५ लिटर द्रव यशस्वीपणे बाहेर काढला.

या प्रक्रियेनंतर रुग्णाचा रक्तदाब १००/७० mmHg पर्यंत सुधारला, श्वासोच्छ्वास सुरळीत झाला आणि तो शुद्धीवर आला. ही परिस्थिती हाताळणे अतिशय आव्हानात्मक होती. आवश्यक उपकरणे नसतानाही योग्य निर्णय घेऊन प्रसंगावधान राखत डॅाक्टरांनी रुग्णाचा जीव वाचवला,असे डॉ. अनुप महाजनी यांनी स्पष्ट केले.

रोहा येथील संवेदन नर्सिंग होममधील मधुमेह तज्ञ आणि फिजिशियन डॉ. मनीष के. वैरागी म्हणाले, या रुग्णाचा वैद्यकीय प्रवास अतिशय गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक होता. सुरुवातीला त्यांना आमच्या रुग्णालयात अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांचा रक्तदाब मोजता येत नव्हता आणि ऑक्सिजन सॅचुरेशन कमी झाले होते. सखोल तपासणी केल्यानंतर आमच्या लक्षात आले की, त्यांना क्रॉनिक पॅनक्रियाटायटिसचा (दीर्घकालीन स्वादुपिंडाचा दाह) त्रास होता, ज्यासोबत वारंवार होणारा प्लुरल इफ्युजन (फुफ्फुसाच्या आवरणातील द्रव साचणे) आणि गंभीर पेरिकार्डियल इफ्युजन (हृदयाभोवतीच्या आवरणातील द्रव साचणे) यांसारख्या गुंतागुंती होत्या, तसेच सेप्टिसेमिक शॉक (रक्तविषारामुळे आलेला धक्का) देखील होता. गेल्या काही महिन्यांत, वेगवेगळ्या केंद्रांवर त्यांच्यावर अनेक वेळा प्लुरल टॅपिंग प्रक्रिया करण्यात आले होते, परंतु मूळ कारणावर पूर्णपणे उपचार न झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा होत नव्हती. आमच्या रुग्णालयातील आयसीयू उपचाराने सुरुवातीला प्रकृतीत सुधारणा होऊनही, आर्थिक मर्यादा आणि उपचार थांबवल्यामुळे रुग्णाची प्रकृती आणखी खालावली आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले.

 डॉ. मनीष पुढे सांगतात की,त्यांच्या रुग्णालयातील वास्तव्यादरम्यान, हृदयाभोवतीच्या आवरणातील द्रव (पेरिकार्डियल फ्लुइड) तातडीने काढून टाकण्याची गरज हे एक मोठे आव्हान होते. ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध नव्हती आणि रुग्णाचे कुटुंबीय आर्थिक व भावनिक कारणांमुळे त्यांना टर्शियरी केअर सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी तयार नव्हते. डॉ. प्रीतीश बागुल आणि नंतर डॉ. अनुप महाजानी यांसारख्या तज्ज्ञांच्या मदतीने, मोठ्या प्रमाणात द्रव काढून जीवनरक्षक पेरिकार्डिओसेंटेसिस प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि रुग्णाची प्रकृती स्थिर करण्यात आली. हे प्रकरण उपचारांमधील सातत्य, वेळीच उपचार आणि तज्ज्ञांमधील एकत्रित प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करते. मी आमच्या टीममधील डॉ. भूषण खारीवाले, डॉ. प्रगती देशमुख, डॉ. ऐश्वर्या पाटील आणि आमच्या नर्सिंग स्टाफचेही आभार मानतो. आता रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिरावली आहे.

या उपचारानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होऊन डॉ. मनीष यांच्याकडे पुढील उपचार व फॉलो-अप देखील घेत आहे. सध्या रुग्णाच्या प्रकृती सुधारणा झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

माझी प्रकृती अचानक खालावल्याने मला श्वास घेण्यासही अडचणी येत होत्या. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यामुळे आज माझा जीव वाचला, अशी प्रतिक्रिया रुग्ण श्री मनोहर पवार यांनी व्यक्त केली.

 मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे सेंटर हेड संदीप जोशी सांगतात की, ग्रामीण व दुर्लक्षित भागांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यास एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो, हे या घटनेतून स्पष्ट होते.ही घटना ग्रामीण भागातही तातडीच्या वैद्यकीय निर्णयक्षमतेचे आणि तज्ज्ञांच्या धाडसाचे महत्त्व अधोरेखित करते.
Comments