प्रभाग क्रमांक १८ (क) मध्ये जनतेचा कौल ;
स्नेहल स्वप्निल ढमाले यांची बिनविरोध निवड...
नागरिकांमध्ये जोश, जल्लोष आणि समाधान...
पनवेल / प्रतिनिधी : -
नवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 18 (क) मध्ये स्नेहल स्वप्निल ढमाले यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड होताच संपूर्ण परिसरात उत्साह, जल्लोष आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
“आमच्या मनातील नगरसेवक अखेर मिळालाच” अशा भावना अनेक नागरिकांनी उघडपणे व्यक्त केल्या.
स्नेहल स्वप्निल ढमाले हे अतिशय लहान वयापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियपणे कार्यरत असून, प्रभागातील सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांवर त्यांचा नेहमीच ठाम आणि निर्भीड सहभाग राहिला आहे. जनतेशी थेट संवाद, कामाची पारदर्शकता आणि सततचा संपर्क यामुळेच ही बिनविरोध निवड शक्य झाल्याचे स्पष्ट दिसून येते.
या निवडीने अनेक राजकीय समीकरणांना सुखद धक्का दिला असून, जनतेने कामाला दिलेला कौल असल्याची चर्चा पनवेलच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना, नवनिर्वाचित नगरसेवक स्नेहल स्वप्निल ढमाले म्हणाले,
“ही जबाबदारी म्हणजे काटेरी मुकुट आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. या मुकुटात नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा दडलेल्या आहेत. म्हणूनच मी अधिकाधिक मेहनत करून प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन. माझा प्रभाग,माझा परिवार मानून अविरतपणे काम करीन. समाजसेवेचा घेतलेला वसा समर्थपणे आणि अविरतपणे पुढे नेईन.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,
“जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि सदिच्छा यामुळेच मला नगरसेवकपदी संधी मिळाली आहे.”
यावेळी त्यांनी प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानले.
ही बिनविरोध निवड म्हणजे काम करणाऱ्या नेतृत्वावर जनतेचा निर्विवाद विश्वास असून, येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक 18 (क) चा सर्वांगीण विकास अधिक गतीने होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.