मातृभूमीच्या 'वंदे मातरम्' अमरस्तोत्रातून देशभक्तीचा जागर
वंदे मातरम गीताचे भव्य स्वरूपात समूहगायन
राष्ट्रप्रेमी उत्सव मातृभूमीप्रती अभिमान, एकता आणि देशभक्तीची भावना जागवणारा अविस्मरणीय अनुभव
पनवेल (हरेश साठे)
स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या 'वंदे मातरम' गीतमध्ये अल्पाक्षरत्व, अर्थपूर्णता आणि अर्थसंपन्नता ही तीन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मातृभूमीचे साक्षात चित्र प्रत्येकाच्या हृदयात करण्याचे सामर्थ्य या गीतामध्ये आहे. हे मातृभूमीचे स्तवन तर आहेच; पण त्याशिवाय त्यामध्ये मातृभूमीच्या कर्तृत्वाचे, तिच्या श्रेष्ठत्वाचे आणि आदरणीय स्वरूपाचे चित्रही रेखाटले आहे. 'वंदे मातरम्' हे एक मातृभूमीचे अमरस्तोत्र आहे आणि त्याचा गजर देशभर घुमत असताना पनवेलमध्येही वंदे मातरम गीताचे भव्य स्वरूपात समूहगायन झाले. नविन पनवेल मधील बांठिया विद्यालयाच्या मैदानावर झालेला हा राष्ट्रप्रेमी उत्सव मातृभूमीप्रती अभिमान, एकता आणि देशभक्तीची भावना जागवणारा अविस्मरणीय अनुभव ठरला.
'वंदे मातरम’ या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात १५० ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. ०७) महाराष्ट्र प्रदेश आणि उत्तर रायगड भाजपच्यावतीने नविन पनवेल मधील के. ए. बांठिया विद्यालय येथे 'वंदे मातरम' समूह गायन विशेष कार्यक्रम राज्याचे वने मंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अभिनेते व राष्ट्रविचाराचे प्रसिद्ध व्याख्याते शरद पोंक्षे यांचे प्रमुख वक्ते म्हणून वंदे मातरम गीताची पार्श्वभूमी व महत्व यावर मार्गदर्शन झाले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, ज्येष्ठ नेते वसंत भोईर, श्रीनंद पटवर्धन, सुनील घरत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, दिपके बेहेरे, चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पूर्व मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, ब्रिजेश पटेल, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, मनोहर म्हात्रे, बबन मुकादम, रवींद्र भगत, तेजस कांडपिळे, नरेश ठाकूर, समीर ठाकूर, सुनील बहिरा, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका सुशीला घरत, राजेश्री वावेकर, प्रिती जॉर्ज, वृषाली वाघमारे, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, जिल्हा सदस्य जितेंद्र म्हात्रे, ऍड. चेतन जाधव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, युवा मोर्चाचे नवीन पनवेल अध्यक्ष मयूर कदम, पनवेल अध्यक्ष हिमेश बहिरा, रोहित जगताप, यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बंकिमचंद्र चटर्जी यांनी 'वंदे मातरम्' हे गीत लिहिले याला १५० वर्षे पूर्ण झाले. 'वंदे मातरम्' असे शब्द उच्चारताच प्रत्येक भारतीयाच्या रोमा-रोमात देशभक्तीचा संचार होतो. स्वातंत्र्यलढ्यात 'वंदे मातरम्' असे म्हणत कितीतरी सत्याग्रहींनी ब्रिटिश साम्राज्याची श्रृंखला तोडण्यासाठी कारागृहाचा मार्ग पत्करला. काळ्या पाण्याची शिक्षा अनुभवली, अनेकजण त्या वेदीवर हुतात्मा झाले. या साऱ्यांच्या मागे प्रेरणा होती ती 'वंदे मातरम्' या गीताची आणि या तेजस्वी मंत्राची. या गीताची महती कितीही वर्षे उलटली, तरी ती सदैव प्रत्येक भारतीयाच्या कानात घुमत आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रीय महासभेच्या अधिवेशनात १८९६ यावर्षी प्रथम वंदे मातरम् ही रचना गायली होती. राष्ट्रीय महासभेने याच वर्षी हे गीत, त्यातील पहिली दोन कडवी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आणि अनुसरले. या गीतावर आधारित एक सुंदर चित्रांकन प्रकाशित झाले होते. त्यातील समर्पकता आणि अर्थपूर्णता विहंगम आणि तेवढीच प्रेरक आहे. १९०५ यावर्षी वंगभंगाची चळवळ शिखरावर पोहोचली, तेव्हा हे गीत बंगालमध्ये प्रत्येक गावोगावी, पंचक्रोशीत घुमू लागले आणि सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. हा भारतीयांच्या प्रखर देशभक्तीचा अभूतपूर्व विजय होता. महर्षी अरविंद यांनी या गीताचे वर्णन राष्ट्रगीत असे केले. या गीतावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली आणि कोणीही समूहाने हे गीत म्हटले की, त्यांना तुरुंगात टाकले जाऊ लागले; पण जितका विरोध, तेवढा प्रतिकार या न्यायाने हे गीत कोट्यवधी भारतीयांच्या ओठावर घुमू लागले. ब्रिटिशांनी या गीतावर बंदी घातली, तरीही हे गीत भारताच्या हृदयातून एखाद्या कारंजीप्रमाणे सतत उसळत राहिले, प्रेरणा देत राहिले. या गीताच्या निर्मितीचे मर्म ब्रिटिश वसाहतवादी व्यवस्थेच्या शोषणात आहे. 'आनंदमठ' कादंबरीमध्ये बंड केलेल्या संन्याशांनी एकत्र येऊन आपल्या मातृभूमीच्या मुक्ततेसाठी गायिलेले हे गीत आहे. कादंबरीचे कथानक आणि गीताची रचना यांचा कालावधी भिन्न असला तरी लेखकाच्या अभिव्यक्तीतील साधर्म्य आणि संतुलन पाहता, तत्कालीन समाजजीवनातील वसाहतवादी सत्तेविरुद्धच्या असंतोषाचा स्फोट या गीतामध्ये झाला आहे. त्यामध्ये देशभक्ती आणि समाजाभिमुख सेवेचा आदर्श यांचा मनोज्ञ संगम झाला असल्याचे दिसून येते. हे गीत त्यामुळे भारताचे राष्ट्रगीत आहे, समाजगीत आहे आणि संस्कृतीगीत सुद्धा आहे. हे मातृभूमी, तुझ्या प्रेरणेने मी नतमस्तक होतो, हे सूत्र घेऊन या गीताची बंकिमचंद्र चटर्जी यांनी 'आनंदमठ' या कादंबरीत रचना केली. त्यांचा प्रत्येक शब्द देशभक्तीच्या भावनेने ओथंबलेला होता आणि आपल्या पुण्यभूमी, पितृभूमी, मातृभूमी विषयी अपार कळवळा आणि प्रेम अभिव्यक्त करणारा होता. वंदे मातरम गीत संपूर्ण देशाला सदैव प्रेरक आणि सदैव नवी स्फूर्ती देत आहे. आज ‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नाही, तर ती भारताच्या आत्म्याची ओळख आहे. या गीताने भारतीयांना परत परत आपल्या भूमीशी, संस्कृतीशी आणि स्वाभिमानाशी जोडले आहे. प्रत्येक पिढीला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा हा अमर मंत्र आजही तेवढ्याच तेजाने घुमतो आहे. राष्ट्रभक्तीची ही ज्योत अखंडपणे प्रज्वलित ठेवणे, हीच खरी श्रद्धांजली सर्व शहीदांना आणि सेनानींना आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे महत्व अनन्य साधारण असल्याने विविध विद्यालयातील तीन हजारहून अधिक विद्यार्थी, विविध संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोट-
मातृभूमीबद्दलचा अभिमान अधिक वृद्धिंगत व्हावा आणि ‘वंदे मातरम’ गीताची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देशभक्तीचे हे वातावरण बघून प्रभावित झालो आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांना समाजातील सुख दुःखाची जाण आहे त्यामुळे ते अशी समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. - राज्याचे वने मंत्री गणेश नाईक
कोट-
‘वंदे मातरम’चा कुठल्याही धर्माशी संबंध नाही. हे गीत ही आपल्या मातृभूमीला, आपल्या पृथ्वीमातेप्रती अर्पण केलेली आदरांजली आहे. या गीतात आपल्या देशाबद्दलची अपार श्रद्धा, प्रेम आणि अभिमान व्यक्त झाला आहे. भारतभूमीचा इतिहास अलौकिक आहे, संस्कृती अद्वितीय आहे, आणि जगाच्या पाठीवर तिच्यासारखी दुसरी भूमी नाही. त्यामुळे ‘वंदे मातरम’चा खरा अर्थ प्रत्येक भारतीयाने समजून घेतला पाहिजे. हे केवळ गीत नाही, तर आपल्या राष्ट्रभावनेचे, एकात्मतेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. - शरद पोंक्षे, अभिनेता व राष्ट्रविचाराचे प्रसिद्ध व्याख्याते
कोट-
“‘वंदे मातरम’ हे गीत सर्वांच्या अस्मितेचे प्रतीक असून ते भारतीय संस्कृतीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. आज या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली. हे गीत भारतभूमीला दिलेला ठेवा आहे. केंद्र व राज्य सरकारने हे कार्यक्रम करत असताना भाजपनेही त्याच अनुषंगाने व्यापक स्वरूपात कार्यक्रम आयोजित केले आहेत. भारतभूमी बद्दल सर्वांना अभिमान आहे. त्यामुळे वंदे मातरम गीत जनमनापर्यंत आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमात विद्यार्थी, संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. - कार्यक्रम प्रमुख संयोजक आमदार प्रशांत ठाकूर