'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
"ज्याप्रमाणे मुंबईत लालबाग-परळमध्ये सणांचा मोठा उत्साह असतो, तसाच उत्साह पनवेलच्या लाईन आळीत पाहायला मिळतो. लाईन आळी म्हणजे पनवेलचे 'लालबाग-परळ' आहे. शिवशक्ती मित्र मंडळ हे केवळ एक मंडळ नसून आपली संस्कृती आणि परंपरा जपणारे एक कुटुंब आहे," अशा शब्दांत पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. लाईन आळी येथील शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक उत्सवाच्या सांगता समारंभात ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते.
कौटुंबिक जिव्हाळा आणि संस्कृतीची जपणूक
नितीन पाटील यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या जिव्हाळ्याचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, "होळीच्या पाच दिवसांच्या उत्सवात इथे जो कौटुंबिक जिव्हाळा पाहायला मिळतो, तो दुर्मिळ आहे. आज या मंडळाने आणि इथल्या कुटुंबाने जो माझा सत्कार केला, तो मला माझ्या स्वतःच्या कुटुंबाने केल्यासारखा वाटतोय. हा आपलेपणा असाच टिकून राहू द्या. तुम्ही मला कधीही हाक द्या, मी तुमच्यासाठी नेहमी 'ओ' द्यायला तयार असेन."
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व मार्गदर्शक रमेश गुडेकर यांनी आपल्या भाषणात मंडळाच्या ध्येयधोरणांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "आमचे मंडळ केवळ उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित नाही, तर वर्षभर सामाजिक उपक्रम राबवण्यात आम्ही अग्रभागी असतो. कार्यकर्त्यांची निष्ठा आणि नागरिकांचे प्रेम हीच आमची खरी ताकद आहे."
या सोहळ्याला माजी नगरसेविका नीता नरसाळे, नगरसेवक अजय बहिरा, नीता माळी, भाजप शहर उपाध्यक्ष केदार भगत, रूपेश नागवेकर, उबाठाच्या शहर संघटिका उज्वला गावडे, पत्रकार संजय कदम, विशाल सावंत, केवल महाडिक आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली.
नगरसेविका नीता नरसाळे यांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. यामध्ये अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष रवी गोरे, कार्याध्यक्ष खंडेश धनावडे व समीर कदम, सहकार्याध्यक्ष सचिन कदम व देवेंद्र तळेकर, सचिव प्रशांत नरसाळे, खजिनदार संतोष तळेकर, सहखजिनदार अनिकेत जाधव, हिशोब तपासनीस अरुण ठाकूर या सर्वांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
आ.विक्रांत पाटील यांचीदेखील उपस्थिती
या कार्यक्रमात आ.विक्रांत पाटील यांनी देखील उपस्थिती दर्शवली.त्यांच्या सोबत कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते.आ.विक्रांत पाटील यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
चौकट
महिला दिनानिमित्त 'अन्नपूर्णांचा' सन्मान
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंडळाने एक स्तुत्य उपक्रम राबवला. उत्सवासाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन जेवण बनवणाऱ्या महिलांचा (अन्नपूर्णांचा) व्यासपीठावर विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, परिसरातील शेकडो महिलांसाठी हळदी-कुंकू सोहळा आयोजित करून त्यांना मंडळाच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.