अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे मतदारांसाठी मोफत सेवा...
अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे मतदारांसाठी मोफत सेवा


पनवेल / प्रतिनिधी
नुकतेच पार पडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत अबोली महिला रिक्षा संघटनेतर्फे एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
अबोली महिला रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संतोष भगत यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक १२ मध्ये मतदारांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत व मतदानानंतर पुन्हा घरी सोडण्याची मोफत रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा दिलासा मिळाला.
या सेवेमुळे अनेक मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग घेतला असून लोकशाही प्रक्रियेला बळ मिळाले आहे. “मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. कोणत्याही अडचणीमुळे कोणीही मतदानापासून वंचित राहू नये,” अशी भूमिका अध्यक्ष संतोष भगत यांनी व्यक्त केली.
अबोली महिला रिक्षा संघटनेने लोकशाही बळकट करण्यासाठी उचललेली ही खारीचा वाट सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. सामाजिक जाणीव ठेवून राबवलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिक, स्थानिक कार्यकर्ते आणि विविध स्तरांतून अध्यक्ष संतोष भगत व त्यांच्या संघटनेचे अभिनंदन केले जात आहे.
Comments