पनवेल महानगरपालिकेला एक आदर्श, प्रगत आणि स्मार्ट महानगरपालिका म्हणून देशात वेगळी ओळख निर्माण करू - आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी)
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे खंबीर नेतृत्व आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे प्रगतशील सरकार असल्यामुळे विकासाला एक नवी दिशा आणि नवी गती मिळाली आहे. या विकासप्रवाहात आपली पनवेल महानगरपालिका अग्रस्थानी असावी, या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेमार्फत विशेष प्रकल्प राबविले जात आहेत. "माझं शहर माझा अजेंडा" या उपक्रमाद्वारे हजारो लोकांनी आम्हाला विकासकामांच्या बाबतीत ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे जाहीरनामा "संकल्प" बनविले आहे. पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी व महायुतीची सत्ता आल्यानंतर केंद्र व राज्य शासनाचा भरघोस निधी उपलब्ध करून पनवेल महानगरपालिकेला एक आदर्श, प्रगत आणि स्मार्ट महानगरपालिका म्हणून देशात वेगळी ओळख निर्माण करू, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पनवेलकर जनतेला आश्वासित केले.
मार्केट यार्ड येथे झालेल्या या पत्रकार परिषेदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, आरपीआयचे शहर अध्यक्ष निलेश सोनावणे, शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख सचिन मोरे, महेश सावंत आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले कि, पनवेल शहरासह खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा, समस्या आणि गरजा मला पूर्णपणे ज्ञात आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढली; त्या वेगानं विकास होणे अपेक्षित आहे. आता महानगरपालिकेची निर्मिती ही विकासाची नवी पहाट ठरली आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय. (आठवले) महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करून या वचननाम्याची अंमलबजावणी करण्याची संधी मिळेल, आणि त्या अनुषंगाने सुरक्षित, स्वच्छ, सशक्त आणि अभिमानास्पद पनवेल घडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
सक्षम पाणी व्यवस्थापन, दर्जेदार रस्ते आणि मजबूत पायाभूत सुविधा, सक्षम अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, सक्षम आणि स्मार्ट सार्वजनिक वाहतूक, महिलांची सुरक्षा, सक्षमता आणि सन्मान, पूल उड्डाणपूल व सुरक्षित वाहतूक, सशक्त आरोग्य सेवा, सुरक्षित गृहनिर्माण व दिलासादायी करसवलती, क्रीडा व क्रीडापटूंचा विकास, स्मार्ट सिटी स्मार्ट सोल्युशन, उद्याने, निसर्ग, स्वच्छता, ज्येष्ठांचा सन्मान आणि सुरक्षा, गावांचा सर्वांगीण विकास, तलावांचा विकास, कायदा व सुव्यवस्था, नागरी सुविधा, कन्व्हेशन सेंटर, नाट्यगृहे, संस्कृती, विचार आणि श्रद्धेचा सन्मान, आधुनिक सुविधा, नियोजनबद्ध शहर, तसेच इतर सुविधांचा त्यांनी उहापोह केला. महायुतीच्या उमेदवारांनी आम्ही नियोजनबद्ध प्रचार केला लोकांशी संवाद साधला त्यामुळे घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर आणि सुज्ञ मतदारांच्या ताकदीवर मोठा विजय मिळवणार आहोत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट सांगितले.
पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ठोस भूमिका मांडत पनवेलच्या जनतेला मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी पनवेलच्या पाण्याचा कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन केले आहे, त्यामुळे आता पनवेलकरांना मुबलक आणि नियमित पाणी मिळणार आहे.आणि त्याच्या खर्चाचा भार महापालिकेवर नसणार आहे. पायाभूत सुविधा, तिसरी मुंबई, पुनर्विकास, प्रकल्प विकासावर भर दिल्याने देवेंद्रजींचे मी आभार मानतो. विरोधकांच्या जाहीरनाम्यात विकासावर भर न देता टीकांशिवाय काहीही नाही. आम्ही ६५ टक्के टॅक्स माफ करू असे सांगतात त्या अनुषंगाने ज्यांना निवडून यायचे नसते ते काहीही आश्वासन देऊ शकतात असे सडेतोड उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले आहे. त्याचा उल्लेखही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केला.
विरोधकांनी एका अर्थाने प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर महापालिका चालवतात असे दाखवण्याचा प्रयत्न केला. भाजपने आमदाराच्या नातेवाईकाला तिकीट न देण्याचा निर्णय घेतला मात्र माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले होते. परेश ठाकूर निवडणूक लढवत नाहीत त्यामुळे आमच्यावरती आरोप करत आहेत त्यांनी आरोप करण्यापूर्वी विचार करावा नंतरच आरोप करावेत आमच्यावर ज्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांच्या बॅनरवर कर्नाळा बँक बुडविणाऱ्याचे फोटो आहे. आणि त्या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे आमच्या प्रयत्नातून मिळाले आहेत. जनतेचा विश्वास विरोधकांनी गमावलेला आहे. त्यांनी त्यांच्या अंतर्मनात डोकावून बघावे. सहा जण बिनविरोध निवडून आले त्यांच्या विरोधात विरुद्व उमेदवारांची कुठली तक्रार नाही त्यांची मुलाखत घ्या, पैसे दिले का, त्यांच्यावर दबाव होता का? मग तुम्ही सक्षम उमेदवार दिले होते कि नाही त्याचा विचार केला का नसेल तर तुम्हाला त्यावर बोलण्याचा अधिकारच नाही, असा मौलिक सल्लाही त्यांनी विरोधकांच्या आरोपावर दिला. जे.एम.म्हात्रे साहेब, प्रीतम म्हात्रे पक्षात आले त्या आधीही नगरसेवक पदाधिकारी आले आता शेकापने विचार केला पाहिजे पक्ष का सोडत आहेत. कारण आता विरोधकांना जनाधार राहिला नाही. १२९ अ च्या बाबतीत उल्लेख केला गेला आहे आणि असे सांगितले जाते कि गावठाण हद्दीतील २२९८३ मालमत्तांना त्याचा फायदा मिळाला. मुळातच आम्ही जर १२९ अ लावण्याच्या विरोधात असतो तर २२९८३ मालमत्तांना त्याचा फायदा मिळाला असता का याचा विचारही विरोधकांनी केला पाहिजे. १२९ अ च्या आधारे त्यांना टॅक्स एकाचवेळी न लागत टप्प्याटप्प्याने लागत गेला त्यामुळे १२९ अ चा फायदा मिळत आहे याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही तर ५० टक्के टॅक्स कमी करा असा ठराव आणला आणि मांडलाही त्या ठरावाला पाठिंबा दिला गेला.आज ज्यांची एका वार्ड पुरती लढाई सुरु आहे त्या विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यामुळे टॅक्स माफ झाली सांगितले त्याच पत्रकार परिषदेत नगरविकास सचिव गोविंदराजन यांचा कोट केला. मग ज्यावेळी गोविंदराजन यांच्यासोबत बैठक झाली त्यावेळी १२९ अ लागू झाला पाहिजे असा सूतोवाच आणि आग्रह का केला नाही असा सवाल उपस्थित करून निवडणूक आल्यावर फक्त मतांसाठी लोकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करत असल्याचा मुद्दा मांडत विरोधकांच्या टॅक्स बाबतच्या संशयात्मक भूमिकेची पोलखोल केली. जेव्हा पायाखालची वाळू सरकते त्या वेळेला वलग्ना सुरु होतात. त्यामुळे विरोधकांनी निवडणुकीपुरते निवडलेले खेळणे करून ठेवले आहे. १५ तारखेपर्यंत खुळखुळ्याप्रमाणे वाजवतील आणि नंतर १६ तारखेला ईव्हीएमच्या नावाने गळा काढतील, असा सणसणीत टोलाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांना लगावला. आपल्या भागात एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडि-सिटी विकसित केली जाणार आहे त्याचा फायदा येथील नागरिकांना विद्यार्थ्यांना झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. विविध योजना, प्रकल्प या भागात येत असताना त्याचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांना होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. आम्ही टीका टिप्पणीवर भर देत नाही तर पनवेल महानगरपालिकेच्या आणि जनतेच्या विकासावर भर देत आहोत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी भाजप महायुतीचे ६६ प्लस उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी निवडणुकीत प्रचारासाठी सहभागी झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सुरेश गोपी, राज्याचे मंत्री पंकजाताई मुंडे,आदितीताई तटकरे, शिवेंद्रराजे भोसले, शंभूराजे देसाई, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गोपीचंद पडळकर, महेंद्र थोरवे, महेश शिंदे, शहाजीबापू पाटील, तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिकांचे आभार मानले.