पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचा षटकार
सहा उमेदवार बिनविरोध; पनवेलमध्ये जल्लोष
विरोधकांना मोठा दणका ...
पनवेल (प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्दर्शनाखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत भाजप महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, त्या अनुषंगाने या निवडणुकीत भाजप महायुतीने विजयाचा षटकार मारला आहे.
यामध्ये विजयाचा पहिला विजयश्रीचा मान प्रभाग १८ मधील नितीन जयराम पाटील यांनी मिळवता होता. त्यानंतर आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच विरोधी उमेदवारांनी आपले अर्जाची माघार घेतली. त्या अनुषंगाने प्रभाग १८ मधून ममता प्रितम म्हात्रे, प्रभाग १९ मधून दर्शना भगवान भोईर, रुचिता गुरुनाथ लोंढे, तर प्रभाग २० मधून अजय तुकाराम बहिरा, प्रियांका तेजस कांडपिळे यांनी बिनविरोध विजय मिळवला. या सर्व विजयी शिलेदारांचे निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, कार्यसम्राट आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, गणेश कडू, राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘एकच वादा प्रशांतदादा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे विजयाचा जल्लोष साजरा केला. पनवेलच्या विकासासाठी नागरिकांनी भाजप महायुतीवर दाखवलेला हा विश्वास अधिक जबाबदारीने पेलत पनवेल शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला. या बिनविरोध निवडीमुळे भाजप महायुतीमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले असून विरोधकांना मात्र मोठा हादरा बसला आहे.