'गौरव रंगभूमीचा' पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे यांचा सन्मान
भव्य-दिव्य आणि सिने-नाट्य सोहळ्याला साजेसा नयनरम्य सोहळा
पनवेल (हरेश साठे) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १२ व्या 'राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका' या राज्यातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या स्पर्धेत पुणेच्या रंग पंढरी संस्थेच्या 'बरड' एकांकिकाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत १२ व्या पर्वातील 'अटल करंडक'वर आपले नाव कोरले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच या वर्षी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सव वर्ष असल्याने या महत्वपूर्ण वर्षानिमित्त 'गौरव रंगभूमीचा' पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे या दोन रंगकर्मीचा गौरव करण्यात आला.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तसेच रंगभूमीवरील एक अत्यंत मान्यवर, अनुभवी अभिनेत्री म्हणून नीना कुलकर्णी ओळखल्या जातात. नाटक, चित्रपट, दूरदर्शन आणि वेब सिरीज या सर्व माध्यमांत त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. तर सुनिल बर्वे हे सुद्धा मराठी रंगभूमी, दूरदर्शन व चित्रपट क्षेत्रातील एक लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांची साधी-सरळ भूमिका ते विनोदी, गंभीर, भावनिक अशा विविध प्रकारच्या भूमिका सहजतेने साकारतात म्हणून ते प्रेक्षकांमध्ये विशेष प्रिय आहेत. या दोन्ही मान्यवरांना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि प्रत्येकी ५० हजार रुपये असे होते. पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे पारितोषिक वितरण आणि सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारापासून रंगमंचापर्यंत संपूर्ण वातावरण एक वेगळीच आणि मनमोहक अनुभूती देणारे होते. प्रवेश करताच भव्य नटराज प्रतिकृतीचे दर्शन मनाला भारावून टाकणारे होते. पुढे एकांकिकांची तपशीलवार माहिती आणि सुबक सजावटीने सजलेली आकर्षक आरास कलाकार, नाट्य रसिक आणि पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होती. कलाकार, मान्यवर आणि प्रेक्षकांसाठी लाल कार्पेटची व्यवस्था करून स्वागताचा देखणा सोहळा उभा करण्यात आला होता. या वर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय अटल करंडक बहारदार सोहळ्याने अधिक विशेष ठरला. थोर दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक कार्याला नेहमीच पाठबळ राहिले आहे. त्यामुळे यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा कलाकार आणि प्रेक्षकांच्या वतीने आयोजकांमार्फत विशेष सत्कार करण्यात आला.
हा महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण व सन्मान सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला सन्माननीय उपस्थिती म्हणून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पनवेल महापालिकेचे उपयुक्त गणेश शेट्ये, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे, दिगदर्शक व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबई प्रमुख कार्यवाह अजित भुरे, सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर, भरत सावले, सुप्रसिद्ध नाट्य निर्मात्या कल्पना कोठारी, अटल करंडक आयोजन कमिटीचे उपाध्यक्ष विलास कोठारी, निर्माता संजय पाटील, अटल करंडक ब्रँड अँम्बेसिडर सुप्रसिद्ध अभिनेते सुव्रत जोशी, अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद शेलार, प्रमोद अत्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, माजी महापौर कविता चौतमोल, युवा मोर्चाचे अध्यक्ष आनंद ढवळे, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, प्रभाकर बहिरा, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा रुचिता लोंढे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहोकर, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, मोनिका महानवर, वर्षा नाईक, अमित ओझे, प्रीतम म्हात्रे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हिमेश बहिरा, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, कार्यवाह श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेळ, स्मिता गांधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेत एकाहून एक सरस अशा एकांकिका सादर झाल्याने बहुमानाचा अटल करंडक यंदा कोण पटकावणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. अखेर या स्पर्धेत सर्वोत्तम ठरलेल्या ' बरड ' एकांकिकाचे नाव जाहीर होऊन त्यांना अटल करंडक विजेता बहुमान मिळाला. या महाअंतिम फेरीचे परीक्षण रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट क्षेत्रातील अत्यंत मान्यवर कलाकार म्हणून ओळखले जाणारे आणि सशक्त अभिनयशैली, दमदार आवाज आणि भावपूर्ण मुखअभिनय यामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक तसेच मराठी टीव्ही आणि रंगभूमीवरील अभिनेत्री व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अनुभवी अभिनेते सुनील तावडे यांनी केले. स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर आणि स्पर्धेचे स्वतःचे शीर्षक गीत असलेली हि महाराष्ट्रातील एकमेव एकांकिका स्पर्धा असून यंदाच्या स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर सुप्रसिद्ध मालिका व सिने अभिनेते सुव्रत जोशी होते.
. नाटय चळवळ वॄद्धींगत करण्यासाठी व नाटय रसिकांना आपले नाटयाविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वॄद्धींगत व्हावा, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी "रंगमंच आमचा कलाविष्कार तुमचा" हे ब्रीदवाक्य घेऊन ‘अटल करंडक एकांकीका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व निटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परिक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नवोदित कलाकार व नाट्य रसिकांच्या गळयातील ताईत बनली असून या स्पर्धेने नाट्यविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. दरवर्षी या स्पर्धेला राज्यातील कलाकार आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असतो, त्यामुळे हि स्पर्धा राज्यात नावाजली. आणि हा नवोदित कलाकारांसाठी एक हक्काचा व्यासपीठ बनले. या स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना यंदाही भरघोस रक्कमेची पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक टीआयपीएल, सहप्रायोजक निल ग्रुप तर मिडिया प्रायोजक सन मराठी आणि टीआरपी मराठी हे सोशल मीडिया प्रायोजक होते. हि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांच्यासह टीम अटल करंडक आणि सीकेटी कॉलेज आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेला नाट्य संस्था, कलाकार आणि युवा आणि ज्येष्ठ रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. भव्य दिव्य सिने नाट्य सोहळ्याला साजेसा असा अद्भुत आणि डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा रंगला होता. दुपारी तीन वाजल्यापासून रसिक प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. सोहळा हाऊस फुल झाल्याने अखेर प्रेक्षक मिळेल त्या जागी बसून तर काहींनी उभे राहून पण शिस्तीने या सोहळ्याचा आनंद लुटला. राज्यातील सर्वात मोठी व नावाजलेल्या या स्पर्धेने सर्वाना भारावून टाकले होते. आणखी विशेष म्हणजे, प्रसिद्ध मराठी अभिनेते व दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांनी त्यांच्या खास विनोदी आणि प्रभावी शैलीत बहारदार सूत्रसंचालन करत कार्यक्रमाला अनोखी रंगत आणली.महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि भव्य दिव्या स्पर्धा असल्याचे अधोरेखित करून एकांकिकेची वार्ता सर्वत्र पोहोचली असल्याचे नमूद केले. तसेच, या सोहळ्याच्या निमित्ताने हास्यजत्रा फेम अरुण कदम, श्याम राजपूत व चेतना भट तसेच हास्यसम्राट विजेते प्रा. दीपक देशपांडे यांचा विनोदी मनमोहक मनोरंजनात्मक कार्यक्रम रंगतदार झाला. या सर्वानी आपल्या अप्रतिम विनोदी कलेची उधळण करत उपस्थितांना खळखळून हसवले.
चौकट- मराठी मन नेहमीच नाट्यकला आणि राजकारणात रममाण होत आले आहे. सामाजिक आणि शैक्षणिक सेवेच्या दृढ व्रतातून आम्ही श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था स्थापन केली. माझा सामाजिक वारसा अधिक विस्तारपूर्वक पुढे नेण्याचे कार्य आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर ही माझी दोन्ही सुपुत्र अत्यंत निष्ठेने पार पाडत आहेत. आज असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत अटल करंडक स्पर्धा उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाली. हजारो नवोदित कलाकारांना प्रेरणा, ऊर्जा आणि दिशा देण्याचे कार्य या ज्येष्ठ कलाकारांनी पार पाडले आहे, याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या सर्वांचे सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद भविष्यातही असाच लाभत राहील, अशी श्रद्धा व्यक्त करतो. यापुढेही आपले ऋणानुबंध कायम राहतील - लोकनेते रामशेठ ठाकूर
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे यांची अभिनेते पुष्कर श्रोत्री व सुव्रत जोशी यांनी परिक्षक मनोगत मुलाखत घेतली. महाअंतिम फेरीत तब्बल २५ एकांकिकाचे परिक्षण करताना आणि त्या बघताना खूप उत्सुकता होती. विषयांचे वैविध्य होते. प्रत्येक जण आपले पोटेन्शल घेऊन स्पर्धेत उतरला होता. एकांकिका सोपे नाही कारण त्यात कला दिसते. हेवा वाटेल असे कलाकार यामध्ये बघायला मिळाले. त्यामुळे आम्हालाही यातून खूप शिकायला मिळाले. आयोजकांमध्ये नम्रता आणि सहकार्याची भावना स्पष्टपणे दिसून आली, असे मत गिरीश ओक यांनी सांगितले. अटल करंडक विषयी खूप ऐकले होते. नवीन पिढीचे लेखन कलाविष्कार पहायला मिळाले. काही कलाकारांनी तर खूप चांगले काम केले असून तरुण पिढीमुळे रंगभूमीला पुढचा आधार मिळाला आहे, असे सुनिल तावडे यांनी म्हंटले. तर प्रतिमा कुलकर्णी यांनी अशा स्पर्धेमुळे आणि संधीमुळे मराठी रंगभूमीला चांगले दिवस येणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धेची वाढती व्याप्ती, कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रेक्षकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अटल करंडक स्पर्धेने एक तपपूर्ती गाठल्याचा उल्लेख करत त्यांनी पुढील अनेक वर्षेही या स्पर्धेवर सदैव आशिर्वाद राहावा, असे आवाहन केले.ज्येष्ठ रंगकर्मी नीनाताई कुलकर्णी आणि सुनील बर्वे यांनी रंगभूमीसाठी केलेल्या अविरत सेवेला त्यांनी कृतज्ञतापूर्वक स्मरले. त्यांची समृद्ध कारकीर्द आणि निष्ठा ही भावी कलाकारांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत, त्यांचा आशिर्वाद नवोदित कलावंतांना कायम लाभत राहावा, अशी मनोगतपूर्ण अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांनी प्रास्ताविक करताना ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या आजवरच्या वाटचालीचा विस्तृत आढावा मांडला. तीन दिवसांची ही स्पर्धा जरी अल्पकालीन असली, तरी तिच्या तयारीसाठी तब्बल सहा महिने मेहनत घ्यावी लागते, असे त्यांनी नमूद केले. उत्कृष्ट कलाकार या व्यासपीठातून घडावेत यासाठी ज्येष्ठ आणि दर्जेदार कलाकारांची परीक्षक म्हणून निवड केली जाते, अशी माहितीही त्यांनी दिली. सन २००५ मध्ये ‘मल्हार करंडक’ ही स्पर्धा जिल्हास्तरावर होत होती. वाढता आवाका आणि वाढती गुणवत्ता लक्षात घेऊन तिला 'राज्यस्तरीय अटल करंडक' या नावाने स्वरूप देण्यात आले आणि आज ‘अटल करंडक’चा यंदाचा १२ वा पर्व यशस्वीपणे पार पडला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठबळासह सर्वांच्या सहकार्यामुळे हे पर्व अधिक भव्य झाले, असे त्यांनी सांगितले. मल्हार करंडकपासून आजवर जयवंत वाडकर यांचे मोलाचे योगदान कायम राहिले असल्याचेही त्यांनी विशेष उल्लेखाने नमूद केले. यंदा राज्यभरातील विविध केंद्रांवर झालेल्या प्राथमिक फेरीत १०२ एकांकिकांनी सहभाग घेतला होता. त्यातून निवडलेल्या २५ उत्कृष्ट एकांकिका अंतिम फेरीत स्पर्धा करीत आहेत. या स्पर्धेच्या यशात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सी. के. टी. महाविद्यालय आणि टीम अटल करंडक यांची अखंड मेहनत असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट - नाट्यकला कधीही जुनी होत नाही आणि तिला निवृत्ती नाही. वाटचालीत रसिकांनी कायम प्रेम दिले. नाट्यकला हि सामूहिक कला आहे. त्यामुळे माझ्या यशात सर्वांचे योगदान आहे. अशा करंडक मधून नव्या पिढीला चांगले व्यासपीठ मिळाले आहे त्यामुळे मराठी नाटकाचे भविष्य उज्वल आहे. माझा पुरस्काराने सन्मान केल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. - सन्मानमूर्ती नीना कुलकर्णी
चौकट - संपूर्ण देशात मराठी रंगभूमी क्रियाशील आहे. तरुण पिढीची शक्ती रंगभूमीसाठी काम करत आहे. त्यामुळे रंगभूमी कायम ऊर्जांवस्थेत राहील. माझा सन्मान केल्याबद्दल आणि अशा उपक्रमाबद्दल ठाकूर कुटुंबीय आणि पनवेलकरांचे मनापासून आभार मानतो. सन्मानमूर्ती सुनील बर्वे
चौकट- २२ वर्षांपूर्वी माझीही सुरुवात अशाच एकांकिका स्पर्धेतून झाली होती. त्या काळात आम्ही एकांकिका सादर करत असताना एवढ्या मोठ्या स्वरूपाच्या स्पर्धा आयोजित केल्या जात नव्हत्या. मात्र, काळाच्या प्रवाहात अटल करंडक स्पर्धेचा परीघ मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि आज ही स्पर्धा राज्यभर विस्तारली आहे. मराठी रसिकांचे नाट्यकलेवर आणि सिनेमावर असलेले प्रेम नेहमीच कलाकारांना ऊर्जा देत आले आहे. कलाकार आयुष्यभर शिकत राहतो, आणि म्हणूनच नवोदित कलाकारांनीही निष्ठेने व सातत्याने प्रयत्न करत राहणे अत्यंत आवश्यक आहे. ‘कलाकारखाना’ या माझ्या संस्थेच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळत आहे. याच धर्तीवर, या स्पर्धेतूनही इच्छुक आणि गुणी नाट्यकलाकारांना व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात पुढे जाण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. - अटल करंडक ब्रँड अँम्बेसिडर सुप्रसिद्ध अभिनेता सुव्रत जोशी
चौकट- मराठी मन नेहमीच नाट्यकला आणि राजकारणात रममाण होत आले आहे. सामाजिक आणि शैक्षणिक सेवेच्या दृढ व्रतातून आम्ही श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था स्थापन केली. माझा सामाजिक वारसा अधिक विस्तारपूर्वक पुढे नेण्याचे कार्य आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर ही माझी दोन्ही सुपुत्र अत्यंत निष्ठेने पार पाडत आहेत. आज असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत अटल करंडक स्पर्धा उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाली. हजारो नवोदित कलाकारांना प्रेरणा, ऊर्जा आणि दिशा देण्याचे कार्य या ज्येष्ठ कलाकारांनी पार पाडले आहे, याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या सर्वांचे सहकार्य, प्रेम आणि आशीर्वाद भविष्यातही असाच लाभत राहील, अशी श्रद्धा व्यक्त करतो. यापुढेही आपले ऋणानुबंध कायम राहतील - लोकनेते रामशेठ ठाकूर
-------------------हे ठरले मानकरी :-------------------------
प्रथम क्रमांक- 'बरड' (रंग पंढरी पुणे) - ०१ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक
द्वितीय क्रमांक- 'सपान' (डॉक्टर ग्रुप बीएमसी हॉस्पिटल मुंबई) - ७५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
तॄतीय क्रमांक- 'स्वातंत्र्य सौभाग्य' (मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुलुंड) - ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ बक्षिसे - 'प्रतीक्षायान' (नाट्य स्पर्श आणि भवन्स महाविद्यालय अंधेरी) १० हजार रुपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ बक्षिसे - 'रेशनकार्ड' (अमर हिंद मंडळ दादर) १० हजार रुपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
लक्षवेधी एकांकिका- 'हॅशटॅग इनोसंट'- अलडेल एज्युकेशन ट्रस्ट सन जॉन कॉलेज पालघर ) ३० हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
परिक्षक पसंती एकांकिका - 'किचकवध पुन्हा'- (सीकेटी स्वायत्तम महाविद्यालय, पनवेल) २० हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
-----------------------------------------------------------
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-
प्रथम क्रमांक- निलेश गोपनारायण ('हॅशटॅग इनोसंट'- अलडेल एज्युकेशन ट्रस्ट सन जॉन कॉलेज पालघर )
०३ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
-----------------------------------------------------------------
- सर्वोत्कृष्ट अभिनेता-
प्रथम क्रमांक- रघुनाथ बर्वे ('हॅशटॅग इनोसंट'- अलडेल एज्युकेशन ट्रस्ट सन जॉन कॉलेज पालघर )
०३ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
-----------------------------------------------------------------
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री-
प्रथम क्रमांक- ताईडी (बरड- रंगपंढरी पुणे)
०३ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
-----------------------------------------------------------------
- सर्वोत्कृष्ट लेखक-
प्रथम क्रमांक- सुनील पोपट डोंगरे (बरड- रंगपंढरी पुणे)
०३ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
-----------------------------------------------------------------
- सर्वोत्कृष्ट नेपथ्य -
प्रथम क्रमांक- अद्वैत साप्ते -'स्वातंत्र्य सौभाग्य' (मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुलुंड)
०३ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
-----------------------------------------------------------------
- सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना-
प्रथम क्रमांक- 'सांग रहियो' (रेवन एंटरटेनमेंट पुणे)
०३ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
-----------------------------------------------------------------
- सर्वोत्कृष्ट संगीत-
प्रथम क्रमांक- रोहित महादेव - 'बरड' (रंग पंढरी पुणे)
०३ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह
-----------------------------------------------------------------
उत्कृष्ट वेशभूषा (कै. किशोर जोशी यांच्या स्मरणार्थ)- गायत्री व नीरजा - 'प्रतीक्षायान' (नाट्य स्पर्श आणि भवन्स महाविद्यालय अंधेरी) ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
अतुल परचुरे सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार - 'सपान' पात्राचे नाव मामा (डॉक्टर ग्रुप बीएमसी हॉस्पिटल मुंबई) ०२ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
उत्कृष्ट बालकलाकार - सुभि -'सपान' -पात्राचे नाव सुमी (डॉक्टर ग्रुप बीएमसी हॉस्पिटल मुंबई) ०१ हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह