१६ डिसेंबरला महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा...
१६ डिसेंबरला महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा

पनवेल काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत दिली माहिती
पनवेल / प्रतिनिधी : -
          काँग्रेस भवन पनवेल येथे शुक्रवार दि. १२ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. पनवेल शहरातील विविध महत्त्वपूर्ण नागरी प्रश्न, महापालिकेची धोरणे आणि नागरिकांवर वाढत असलेला ताण याबाबत या पत्रकार परिषदेत आघाडीतील नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पनवेल महानगरपालिकेचा वाढीव मालमत्ता कर, शहरातील रस्ते, पाणीटंचाई, तळोजा एमआयडीसी परिसरातील गंभीर प्रदूषण यांसह अनेक तातडीच्या समस्यांकडे लक्ष वेधले. तसेच महापालिका क्षेत्रात उभारण्यात आलेल्या अवास्तव आणि बस थांब्यांबाबतही महाविकास आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त केली.
              या सर्व प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी मंगळवार दि. १६ डिसेंबर रोजी पनवेलमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या मोर्चात महाविकास आघाडीतील राज्यपातळीवरील प्रमुख नेतेही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांवरील वाढता भार आणि महापालिकेच्या हलगर्जीविरोधात मोठ्या प्रमाणावर जनतेचा सहभाग अपेक्षित असल्याचेही नेत्यांनी सांगितले.
              याचबरोबर विमानतळाच्या नामांतराविषयी महत्त्वाची माहिती देताना व्यासपीठावर उपस्थित नेत्यांनी सांगितले की, २५ डिसेंबरपासून नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रत्यक्ष उड्डाणांची सुरुवात होणार आहे. या विमानतळाला लोकनेते स्व. दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठीही महाविकास आघाडीने जोरदार भूमिका मांडली आहे. या मागणीसाठी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
              या पत्रकार परिषदेला माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शेकापचे ज्येष्ठ नेते नारायण घरत, शेकाप विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, मनसे प्रवक्ते तथा पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, माजी नगरसेविका लीना गरड, रामदास पाटील, अवचित राऊत, प्रदीप ठाकूर, प्रवीण जाधव, हेमराज म्हात्रे, शशिकला सिंह, निर्मला म्हात्रे, नाना ननावरे, यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments