शेअर्स मार्केट ट्रेडिंग चे अमिष दाखवून कोट्यावधीची आर्थिक फसवणूक करणार्‍या ७ आरोपींच्या टोळीस नवी मुंबई सायबर पोलीस ठाणेकडून अटक...
७ आरोपींच्या टोळीस नवी मुंबई सायबर पोलीस ठाणेकडून अटक...
पनवेल वैभव, दि.4 (संजय कदम) ः शेअर्स मार्केट ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीतून जास्त फायदा मिळवून देतो असे दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यावर, गुंतवणुकीवर रक्कम पाठविण्यास सांगून सदर रक्कम परत न करणार्‍या 7 जणांच्या टोळीस नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्याकडून अटक करण्यात आली आहे.
दि. 02/09/2025 ते 08/10/2025 रोजीचे कालावधीत आरोपींनी शेअर्स मार्केट ट्रेडिंग मध्ये गुंतवणुकीतून जास्त फायदा मिळवुन देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन करून, वेगवेगळ्या बँक खात्यावर, गुंतवणुकीकरिता रक्कम पाठवण्यास सांगितली. 
बनावट अ‍ॅपवर सदर गुंतविलेल्या रकमेवर मोठ्या प्रमाणात आभासी नफा दाखवुन फिर्यादींना मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतविण्यास भाग पाडुन गुंतविलेली रक्कम परत न करता रू. 1,07,80,000/- ची आर्थिक फसवणुक केली. यााबबतचा गुन्हा 51/2025 बी.एन.एस. कलम 319(2), 318(4), 336(2), 336(3), 340(2), 3 (5), सह कलम 66(डी) आय.टी. अ‍ॅक्ट अधिनियम अन्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्त, नवी मुंबई, मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सचिन गुंजाळ यांनी सायबर फसवणूकीचे गुन्हे उघडकीस आणून त्यास प्रतिबंध करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. व त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत सायबर युनिट स्थापन करण्यात आले होते. त्यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त, आ.गु.शा. सायबर, श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे वपोनि विशाल पाटील व पोनि गणेश जाधव यांचे नेतृत्वामध्ये पोउपनिरी रोहित बंडगर, स. फौ. विजय आयरे (तांत्रीक तपास), पो.शि. पुनम गडगे (तांत्रीक तपास), पो. ना. रविराज कांबळे, पो.शि. भाऊसाहेब फटांगरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. 
सायबर पो.स्टे.च्या पथकाने गुन्ह्यातील फिर्यादी यांची फसवणुकीची रक्कम वळते झालेले प्रथम स्तरावरील करंट अकाउंन्ट खाते धारक सुरेश तळेकर, वय 29 वर्षे, धंदा-बुर्जीपाव विक्री यास खराडी, पुणे येथुन दिनांक 29/10/2025 रोजी अटक केली. तसेच त्याचा साथीदार विकास आव्हाड, वय 30 वर्षे, धंदा-नोकरी, रा.हवेली, खराडी, पुणे यास दि. 31/10/2025 रोजी अटक केली. गुन्हयातील आरोपी क्रमांक 03 विशाल व्हनमाने, वय 24 वर्षे, धंदा-नोकरी, रा. गट नं 1035, मदनेवस्ती, कोळवाडी, थेउर, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक तपास करता आरोपीत हा टेलिग्राम ग्रुपवरील अनोळखी आयडी धारकांच्या संपर्कात येऊन त्याच्या टेलीग्राम वरील चॅटींगव्दारे तो प्रथम महापे, नवी मुंबई येथील एका हॉटेल मध्ये आला. तेथे त्याला तीन अनोळखी इसम भेटले. त्यांनी त्याचे करंट अकाउंन्टला लिंक असलेले सिमकार्ड त्याचेकडुन मागवून घेतले. सदर तीन अनोळखी इसम हे हिंदी भाषिक होते. त्यांच्या बोलण्यावरून ते परराज्यातील वाटत होते. सदर अनोळखी तीन इसम हे वारंवार नवी मुंबई मधील हॉटेल बदलत असल्याची माहिती आरोपीताकडे केलेल्या चौकशी मध्ये निष्पन्न झाल्याने तसेच आरोपी हा पहिल्यांदा नवी मुंबई येथे आल्याने त्याला कुठल्या हॉटेल मध्ये मुक्कामी होता हे सांगता येत नव्हते.
तपास पथकाने आरोपी कडे केलेल्या चौकशीच्या आधारे नवी मुंबई मधील महापे, सानपाडा, कोपरखैरणे, ए.पी.एम.सी. व वाशी येथील विविध साधारण 35 ते 40 लॉज व हॉटेलची तपासणी करून अहोरात्र मेहनत करुन, पारंपरिक व आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्य पूर्ण वापर करून ए.पी.एम.सी. वाशी येथील हॉटेल राधे रेसिडेंसी येथून 5 आरोपीतांना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक केले. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता यातील तीन आरोपी हे टेलिग्राम अ‍ॅपद्वारे चायना व कंबोडीया येथील सायबर फॉडस्टर यांच्या संपर्कात होते. तसेच सदर आरोपी हे त्यांच्या कडील असलेल्या मोबाईल मध्ये विविध राज्यांमधून आलेल्या करंट अकाउंट धारकांचे अकाउंटला लिंक असलेले सिमकार्ड हे स्वतः कडील मोबाईल मध्ये टाकून चायना व कंबोडीया मधील सायबर फॉडस्टर यांना ेज्ञरू से डचड  डशपवशी अ‍ॅपद्वारे करंट बैंक अकाउंट ट्रानझेक्शनचे (ओटीपी) फॉरवर्ड करुन ट्रांनझेक्शन करायचे. सदरच्या गुन्हयामध्ये भारत देशातील विविध राज्यातील 118 बँक खाते गोठविले असुन त्यामध्ये एकुण रक्कम रूपये 32,50,000/- (रूपये बत्तीस लाख पन्नास हजार मात्र) गोठवण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचा तपास सायबर पोलीस ठाणेचे वपोनि.  विशाल पाटील करित आहेत.


कोट
आरोपीतांकडुन टेलिग्राम, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडीया वर शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणुक करण्याची जाहिरात बनवुन मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याचे आमिष दाखवण्यात येते. त्यानंतर त्यांनीच बनविलेल्या बनावट वेबपोर्टल वर जास्तीचा आभासी फायदा दाखवुन जास्तीत जास्त गुंतवणुक करण्यास भाग पाडुन फसवणुक करतात. याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, टेलिग्राम, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडीया वर शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या जाहिरातींची खात्री करा, त्यांना आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देवू नका व कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका. जास्त नफा मिळविण्याच्या प्रलोभनाला बळी पडू नका.
Comments