आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील १०० विद्यार्थिनींना यष्टी प्रशिक्षण
पनवेल वैभव / दि. २१ ( वार्ताहर ) : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील १०० विद्यार्थिनींना सांस्कृतिक प्रकोष्ठ, कोकण विभाग,भाजप व राष्ट्र सेविका समिती, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने यष्टी प्रशिक्षण देण्यात आले.
काळाची गरज ओळखून इ. ७ वी व ८ वीत शिकणाऱ्या इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थिनींना यष्टी या प्राचीन शस्त्राच्या आधारे स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या समारोप समारंभाच्या प्रास्ताविकात बोलताना विद्यालयाच्या माध्यमिक विभाग -मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका समिता सोमण म्हणाल्या, "आत्मनिर्भर मुली तयार करण्याच्यादृष्टीने हे पहिले पाऊल आहे. मुलींना त्यांच्या शारीरिक क्षमतांची ओळख या प्रशिक्षणातून झाली. मुलींच्या सक्षमीकरणाच्या अश्या अनेक उपक्रमांसाठी विद्यालय नेहमी सहकार्य करेल." असे आश्वासन त्यांनी दिले. या उपक्रमाच्या समन्वयक व सांस्कृतिक प्रकोष्ठ कोकण विभाग भाजपच्या अध्यक्षा अक्षया चितळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना शारीरिक बळ वाढवण्याचे प्रेमळ आवाहन केले. त्या पुढे म्हणाल्या, दहा हजार मुलींच्या सक्षमीकरणाचा आमचा संकल्प आहे. यष्टी या सहज उपलब्ध होणाऱ्या शस्त्राच्या वापरात मुली तरबेज झाल्या तर समाजात घडणारे अनुचित प्रकार रोखण्यास मदत होईल. याप्रसंगी व्यासपीठावर योगिनी डोंगरे, मानसी कोकजे व मंजुषा भावे आदी मान्यवर उपस्थित होते. यष्टी शिक्षिका म्हणून जान्हवी शिंदे ,जान्हवी साठे, महती देशमुख ,अनन्या जोशी, तन्वी जोशी आणि त्यांना सह शिक्षिका म्हणून अनुराधाताई ओगले, श्रद्धा देशमुख ,कल्पनाताई राऊत , अपराजिता घांगुर्डे, यांनी काम पाहिले. उत्तम यष्टी तरबेज अश्या १० मुलींना पुस्तक व यष्टी भेट देऊन प्रोत्साहन देण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात इ. ८ वीतील श्रेया तांदळे हिने मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. विद्यालयातील माध्यमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यालयातील मराठी माध्यमातील सहाय्यक शिक्षिका प्रीती धोपाटे यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो - यष्टी प्रशिक्षण