कामोठेत “मा. श्री. परेशशेठ ठाकूर केसरी” भव्य कुस्ती स्पर्धा ; दिग्गज मल्ल आमने-सामने
लाल मातीत पुन्हा एकदा कुस्तीचा रोमांचक थरार!


पनवेल (प्रतिनिधी)महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून, शौर्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने“मा.श्री.परेशशेठ ठाकूर केसरी” भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 ही स्पर्धा रविवार, दिनांक १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता कामोठे येथील सेक्टर ६ मधील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानात लाल मातीवर पार पडणार आहे. या स्पर्धेतील एकूण पारितोषिकांची रक्कम ११ लाख ११ हजार १११ रुपये इतकी असून, नामवंत मल्ल या स्पर्धेत आपल्या ताकदीची चुणूक दाखवणार आहेत. कुस्ती स्पर्धा फक्त एक खेळ नाही, तर देशाच्या मातीतल्या परंपरेचा, ताकदीचा आणि सन्मानाचा एक उत्सव असतो. लढतींत ताकद, धैर्य आणि कुशलता यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. त्यामुळे लाल मातीच्या या खेळाला अनन्य साधारण महत्व आहे.  या स्पर्धेत रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख विरुद्ध हिंद केसरी पै. सुखविंदर सिंह, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी विरुद्ध पै. रिकार्डो अमेरिका (अमेरिका), डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे विरुद्ध हिंद केसरी पै. विक्रांत कुमार तसेच उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत विरुद्ध हिंद केसरी पै. हितेंद्र कुमार या दिग्गज व नामवंत कुस्तीपटूंचे रोमहर्षक सामने होणार आहेत. त्या अनुषंगाने या स्पर्धेची जोरदार तयारी सुरु करण्यात येत आहे.
Comments