सत्य संस्कृती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते वाटप...
नवीन पनवेल : पनवेल- नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघटनेच्या सदस्यांना तुकाराम बीजचे औचित्य साधून अपघात विम्याचे वाटप 16 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह, पनवेल येथे करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे सत्य संस्कृती चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन जोशी, नीरज पांडे, ललित सिंग मेहता उपस्थित होते.
पनवेल- नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मयुर तांबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि गतवर्षी राबवलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली. संस्थेने गतवर्षी 33 सायकल वाटपाचा कार्यक्रम, धामोळे वाडी येथे विद्यार्थ्यांना खाऊ आणि ब्लँकेट वाटप केले होते. यावर्षी दुसऱ्यांदा मयुर तांबडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकार संघटनेच्या सदस्यांना 5 लाखाच्या अपघात विम्याचे वाटप करण्यात आले. पत्रकार हा समाजाचा आरसा असल्याने नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि बातम्यांसाठी इतरत्र फिरावे लागते. बऱ्याचदा अपघात झाल्यास जवळ पैसा नसल्याने त्याला अडचण निर्माण होते. त्यामुळे संघटनेच्या सदस्यांचे अपघात विमा काढण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. आगामी काळात गरीब, गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष दीपक कांबळे, सचिव लालचंद यादव, खजिनदार मिलिंद खारपाटील, अशोक गोरडे, दीपक जगे, समीर वेशवीकर, पंकज तांबडे, पत्रकार अनिल कुरघोडे, अण्णासाहेब आहेर उपस्थित होते. यावेळी मोहन जोशी यांनी पत्रकार संघटनेने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.