पत्रकारांतर्फे मुलांना खाऊ आणि ब्लॅंकेट वाटप
पनवेल : पनवेल- नवी मुंबई प्रिंट डिजिटल पत्रकार संघ आणि श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्ताने खारघर- धामोळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि गावामध्ये ब्लॅंकेट आणि खाऊवाटप करण्यात आले.
सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जातो. याचे औचित्य साधून आठ जानेवारी रोजी पत्रकार संघटनेतर्फे ब्लँकेट आणि 50 हून अधिक विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचे आयोजन धामोळेवाडी येथे करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊवाटप केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मयूर तांबडे, उपाध्यक्ष समीर वेशवीकर, सचिव दीपक घरत, रमेश भोळे, दिपक जगे, रमेश भोळे, लालचंद यादव, अशोक गोरडे, दीपक कांबळे, मिलिंद खारपाटील, पंकज तांबडे तसेच प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर सचदेव, सामाजिक कार्यकर्त्या चंचला बनकर, ऍड वैशाली पंडित, नाना रणदिवे, शिक्षिका, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.