नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल - केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल, अशी ग्वाही देतानाच आमच्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे चांगले काम आहे. जनता त्यांच्या सोबत आहे. मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल आणि या ठिकाणी दोन्ही आमदार प्रचंड मतांनी निवडून येतील, असा ठाम विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी करंजाडे येथे उरण विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या प्रचार सभेत व्यक्त केला. 
         या सभेला प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, उमेदवार आमदार महेश बालदी, दि. बा. पाटील साहबांचे सुपुत्र अतुल पाटील, भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष  अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कर्णा शेलार, सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, समीर केणी, सुभाष म्हात्रे, माजी प. स. सदस्या रेखाताई म्हात्रे, युवा नेते रुपेश धुमाळ,राकेश गायकवाड, प्रकाश पाटील,सेनेचे महाराष्ट्र सचिव रूपेश पाटील, संदेश पाटील,  राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंग पाटील व आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
         यावेळी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच  नाव देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्यातील  पुणे आणि नवी मुंबई या  दोन विमानतळाचे नामकरण करण्यात येणार आहे . पुण्याला संत तुकाराम महाराज यांचे तर  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला  दि. बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.  खारघर येथे देशाचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी दि. बा. पाटील यांच्या बद्दल  गौरवोद्गार उदगार काढले. त्यामुळे तुमच्या मनातील शंका आता काढून टाका,  एक लाख टक्के त्यांचे नाव दिले जाईल आणि दिलेले वचन मी पूर्ण करणार  आहे .  विमानतळासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या त्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी त्यांच्या नोकरीचा विषय असेल किवा मोबदल्याचा विषय असेल ते मला हक्काने सांगा मी पूर्ण करून देईन , मागे हटणार नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. या ठिकाणी दोन रनवे आहेत पण  तिसर्‍या आणि चौथ्या रनवेच्या शक्यतेच्या रिपोर्टवर आता काम सुरू आहे . त्यामुळे  विस्थापित होणार्‍या पाच गावांचे  पुनर्वसन आणि त्यांना  योग्य मोबदला  दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 
             या निवडणूकीचा नुकताच एक सर्वे आला आहे त्याप्रमाणे महायुतीच्या १८५ ते १९०  आसपास जागा निवडून  येऊन पुन्हा महायुतीचे सरकार  येईल . त्यामध्ये उरणला महेश बालदी तर पनवेलला प्रशांत ठाकूर निवडून येण्याचे स्पष्ट आहे. विकसित भारताचे स्वप्न मोदीजींनी पाहिले. दहा वर्षे जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली. त्याकडे मी विकसित भारताचा पाया म्हणून पाहत असल्याचे मोदीजी आवर्जून सांगतात. जागतिक स्तरावर आपण आज पाचव्या अर्थव्यवस्थेवर आलो. एका बाजूला जागतिक स्तरावर देशाचे नाव मोठे करणे आणि दुसर्‍या बाजूला देशातील जनतेच्या हिताचा ही विचार करणे ही भूमिका घेऊन मोदीजी काम करीत आहेत. राज्यात ही आपल्या महायुती सरकारने अडीच वर्षात ५२ टक्के विदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात आणली हे आपले यश आहे. अनेक विकासाची कामे अडीच वर्षात करण्यात आली. सर्व सामान्यांच्या हिताचा विचार करून लाडकी बहीण योजना, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि युवकांचे प्रश्न सोडवले. असंख्य जन कल्याणाच्या योजना सुरू केल्या आहेत. साडेपाच हजार कोटीची कामे या विधानसभा मतदार  संघात केली आहेत.  पनवेल - उरण मार्गावरील नवीन पूल करण्याची मागणी महेश बालदी पूर्ण करतील असे ही त्यांनी सांगितले
                  खासदार श्रीरंग बारणे यांनी आमदार बालदी यांच्या कामाचे कौतुक  केले. २०१४ मध्ये आमदार असलेल्यांनी किती निधि आणला त्यांच्या कामाची पध्दत याची तुलना त्यांनी केली. महेश बालदी यांनी या भागाचा  कायापालट करताना राज्य सरकारच्या अनेक योजना राबवल्या. येथील पाण्याचा, रस्त्याचा प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवला. सकारात्मक काम केले आहे. महेश बालदी सगळ्या गोष्टी करतात याची खंत विरोधकांना आहे. या भागात चांगल्या योजना मार्गी लागण्यासाठी आमदार महेश बालदी यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  
              लोकनेते  रामशेठ ठाकूर यांनी बोलताना, उलवे येथील गर्दी पाहिल्यावर मी भविष्य वर्तवले होते की महेश बालदी पुन्हा आमदार होणार.  आज येथे आल्यावर गर्दी पाहून वाटते मागच्या पेक्षा यावेळी जास्त आघाडी घेऊन निवडून येतील असे चित्र दिसायला लागले आहे.  महेश  बालदी हे उरणच्या नगरपालिकेच्या शाळेत व  इथल्याच कॉलेज मध्ये शिकले आहेत. त्यामुळे आपला देश एक असताना  जे लोक ते इकडचा - तिकडचा करतात त्यांच्या बुध्दीची किव करावीशी वाटते. एखादी व्यक्ति १५ वर्षे इथे राहिली कि ती स्थानिक होते, महेश बालदी तर पिढ्यांपिढ्या इथे राहिलेले आहेत. येथील लोकांची ते  कामे करतात. त्यांचा वावर आगरी, कोळी, कर्‍हाडी, परप्रांतीया पासून अगदी मराठा समाजामध्ये सुध्दा  असतो. भविष्यात प्रश्न सोडवण्यासाठी  व विकासाची कामे करण्यासाठी हक्काची माणसे लागतात यासाठी महेश बालदी यांना निवडून देणे गरजेचे आहे. असेही नमूद केले तसेच विमानतळाच्या अनुषंगाने विस्थापित होणार्‍या पाच गावांना ही तोच न्याय देण्याची मागणी केली.  
     आमदार महेश बालदी यांनी यावेळी पुढील पाच वर्षात उरण मतदार संघातील आदिवासी वाडीतील एक ही घर कुडाचे असणार नाही सर्वांना पक्की घरे मिळतील असे सांगून करंजाडे नोड आधुनिक बनविल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही  आता पाच हजार कोटीची कामे केली पुढील पाच वर्षात १५ हजार कोटीची कामे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी सरपंच मंगेश शेलार, रूपेश पाटील, रेखा म्हात्रे आणि अतुल पाटील यांनीही आपल्या भाषणातून आमदार महेश बालदी यांना निवडून देण्याचे आवाहन केले
Comments