राहुल गांधीना संविधान पोरखेळ वाटतं का -ऍड. प्रकाश बिनेदार यांचा सवाल...
राहुल गांधीना संविधान पोरखेळ वाटतं का -ऍड. प्रकाश बिनेदार यांचा सवाल 
पनवेल (प्रतिनिधी) काँग्रेसचे राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?, असा सवाल भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस तसेच मागासवर्गीय समाजाचे नेते ऍड. प्रकाश बिनेदार यांनी केला आहे.  नागपूरमधील सभेतील संविधानाच्या पुस्तकाचा एक व्हिडीओ शेअर झाला आहे.  यात हे पुस्तक कोरेच असल्याचे दिसले. त्यामुळे संविधानाच्या कोऱ्या प्रती वाटल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे.
      ऍड. प्रकाश बिनेदार यांनी म्हंटले आहे कि,  "राहुल गांधी तुम्ही लोकसभा निवडणुकीपासून हातात संविधान घेऊन संविधान वाचवा म्हणून जो काही कांगावा करत आहात, त्यातला खोटेपणा जनतेच्या कधीच लक्षात आला आहे. पण आता मात्र तुम्ही हद्दच पार केली आहे. संविधानाच्या कोऱ्या प्रती तुम्ही वाटल्या आणि तिच प्रत हातात घेऊन खोटीनाटी अश्वासने दिली. तुमचे नेते विजय वड्डेटीवार तुमची बाजू घेण्याच्या नादात आणि भाजपला खोटं ठरवण्याच्या नादात म्हणाले ते लाल रंगाचे नोटपॅड होते. म्हणजेच एका अर्थाने त्यांनीही तुमचा हा थिल्लरपणा कबुलही केला आहे. "कोरं संविधान छापणं हा आमच्या महामानवाचा अपमान आहे. तो आम्ही भारतीय सहन करणार नाही. तुमच्यासाठी शाहू-फुले- आंबेडकर हे फक्त भाषण करण्याचे मुद्दे असतील. आमच्यासाठी तो स्वाभिमान आहे आणि संविधान म्हणजे भारताचा आत्मा आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना जनता कदापिही माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.
Comments