शेकापचे प्रितमदादा म्हात्रे यांनी रॅलीत भाग घेत केले अखिलदादांच्या आयोजनाचे कौतुक
पनवेल वैभववृत्त सेवा : -
नवी मुंबईतील उलवेमध्ये सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि सातत्याने ६ वर्षे उलवेकरांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारे शिवसंघर्ष प्रतिष्ठानमार्फत यंदा देखील भव्यदिव्य स्वरूपात नवरात्र उत्सव साजरा होत आहे. शेकाप नेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत असून दिनांक २९ सप्टेंबर रोजी 'नवसाला पावणारी उलवेची महाराणी'चा नेत्रदीपक आगमन सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उलवे सेक्टर २०, रेडक्लिफ शाळेजवळच्या भव्य मैदानात फटाक्यांच्या आतिषबाजीत देवीचे आगमन झाले. मात्र त्यापूर्वी उल्वेची महाराणीची भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शेकापचे प्रितमदादा म्हात्रे यांच्यासह प्रतिष्ठानच्या महिला सदस्या, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य उलवेकरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
'वादळ' या प्रसिद्ध ढोल पथकाने रॅलीत उत्कृष्ट वादन करून उपस्थितांना 'ढोल-ताशाच्या ठेक्यावर थिरकायला भाग पाडले. महिलांनी एकसारखा पोशाख करून विशेष लक्ष वेधले तर महाराणीचा फुलांची सजवलेला भव्य रथ विशेष आकर्षण ठरला. फटाक्यांच्या आतिषबाजीने अक्षरशः डोळे दिपवणारा नयनरम्य नजारा यावेळी उलवेकरांनी अनुभवला. तसेच चिमुकल्यांनी लाठी-काठीचे थरारक कौशल्य दाखवले तर मावळ्यांच्या वेशातील तरुणांनी तलवारबाजीसह शिवकालीन खेळांचे उत्तम प्रदर्शन केले. महिलांनी फुगडी आणि पारंपरिक नाच करत ठेका धरला होता. या सगळ्यामुळे 'उलवेची महाराणी'च्या आगमन सोहळ्याला भव्य आणि ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले होते.
एकूणच उलवेकरांची प्रतिमा उंचावणारा आणि मनोरंजनाचे सर्व रेकॉर्ड तोडणारा हा सोहळा संपन्न होणार असल्याचे तयारीवरूनच दिसून येत असल्याचे कौतुकोद्गार प्रितमदादा म्हात्रे यांनी काढले.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे या नवरात्र उत्सवात ९ दिवस दांडिया, रास गरबा खेळला जाणार असून बक्षिसांची उधळण विजेत्यांवर होणार आहे. तसेच लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आला आहे. लाखो रुपयांची बक्षिसे आयोजकांकडून घोषित करण्यात आली आहेत. भाविकांनी दर्शनासाठी जरूर यावे आणि नवसाला पावणाऱ्या 'उलवेची महाराणी'चे आशीर्वाद घ्यावेत असे आवाहन अखिलदादा यादव यांनी केले आहे.
यावेळी शेकाप नेते प्रितमदादा म्हात्रे यांच्यासह शिवसंघर्ष प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा राधा गोरीवले, उपाध्यक्षा सिमरन सूर्यवंशी, खजिनदार तैमिजा सोनवणे, कार्याध्यक्ष मीना प्रजापती, उपाध्यक्षा ज्योती गोक्षे, सचिव मयुरी सोमासे, नेहा अखिल यादव यांची विशेष उपस्थिती होती.