गणेशोत्सव सर्वांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करावा ; परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते
पनवेल वैभव , दि.3 (संजय कदम) ः आगामी काळात येणारा गणेशोत्सव हा सर्वांनी मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषात साजरा करावा परंतु हा सण साजरा करीत असताना शासनाने आखून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करावे असे आवाहन आज नवीन पनवेल आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित नवी मुंबई पोलीस आयुक्तालय विघ्नहर्ता पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.
या कार्यक्रमाला परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, सहा.पोलीस आयुक्त डॉ.विशाल नेहुल, सहा.पोलीस आयुक्त अशोक राजपूत आदींसह इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी त्याचप्रमाणे परिमंडळ 2 हद्दीतील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ विघ्नहर्ता पुरस्कार वितरण प्रसंगी उत्कृष्ट गणेशमुर्ती म्हणून प्रथम क्रमांक कळंबोली येथील एकता सामाजिक सेवा संस्था, रोडपालीचा राजा, खांदा वसाहत येथील ओंकार मित्र मंडळ, रायगडचा राजा याला द्वितीय क्रमांक, उत्कृष्ट पद्धतीने राबविलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल खांदा वसाहत येथील हरि ओम सामाजिक मित्र मंडळ यास प्रथम क्रमांक, तर खारघर येथील खारघर नगर रहिवासी सेवा संघ यांना द्वितीय क्रमांक, शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक म्हणून तळोजा येथील जय दुर्गा क्रिडा व ग्रामविकास तरुण मंडळास प्रथम क्रमांक तर पनवेल शहरातील अभिनव युवक मित्र मंडळ यांना द्वितीय क्रमांक, उत्कृष्ट देखावा म्हणून कळंबोली येथील बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना प्रथम क्रमांक तर कळंबोली येथील राजे शिवाजीनगर रहिवाशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कळंबोली यांना द्वितीय क्रमांक त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ कामोठे वसाहतीमधील श्री गणेश मित्र मंडळाला प्रथम क्रमांक तर खारघर येथील खारघरचा राजा सेक्टर 12 यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
यावेळी बोलताना परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सर्व विजेत्या मंडळांचे अभिनंदन करून आगामी काळात सुद्धा जास्तीत जास्त मंडळांनी अशा प्रकारच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा. तसेच शासनामार्फत अशा प्रकारच्या लाखो रुपये किंमतीच्या बक्षिस असलेल्या स्पर्धा घेण्यात येतात यात सहभाग घेवून आपला गणेशोत्सव आनंदात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. तर यावेळी बोलताना पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले की, पनवेलकर हे सर्व सण व उत्सव एकत्रितपणे येवून अत्यंत उत्साहात व शांततेच्या मार्गाने साजरे करीत असतात. आगामी गणेशोत्सव काळामध्ये गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा बाप्पांना घरी आणताना तसेच विसर्जन करताना त्रास होवू नये यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात आली आहे. विसर्जन ठिकाणी लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे, तराफे, लाईफ जॅकेट, लाईफ गार्ड यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. तसेच अतिशय काटेकोरपणे हा उत्सव किती देखणा होईल याकडे महानगरपालिका सुद्धा लक्ष ठेवून आहे. या संदर्भात कोणाच्या काही सूचना असल्यास त्यांनी महानगरपालिकेकडे संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा केले आहे. यावेळी अनेक मंडळांच्या सदस्यांनी गणेशोत्सवाच्या काळात होणार्या अडीअडचणी व सुचना येथे मांडल्या. त्या सुचनांचे निराकरण मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा.पोलीस आयुक्त डॉ.विशाल नेहुल तर आभार प्रदर्शन सहा.पोलीस उपायुक्त अशोक राजपूत यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदिका शुभांगी पाटील यांनी केले. यावेळी परिक्षक मंडळाचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
ः