सामाजिक न्याय व अधिकता राज्यमंत्री रामदास आठवले
पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः देशभरात आगामी होणार्या सर्व निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होण्यासाठी आपण सर्वांनी आतापासून कामाला लागावे. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपली मोठी ताकद असून त्याचा फायदा महायुतीला निश्चितच होईल. परंतु महायुतीने सुद्धा जागा वाटप करताना आमच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा व आम्हाला सुद्धा मानाचे स्थान द्यावे असे आवाहन पनवेल येथील आद्य क्रांतीविर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात सामाजिक न्याय व अधिकता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
यावेळी ना.रामदास आठवले हे सलग तीनदा केंद्रात मंत्री झाल्याने त्याचप्रमाणे नवनिर्वाचित खासदार यांचा विशेष सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र आणि तालुका यांच्यातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मा.खा.रामशेठ ठाकूर, आ.प्रशांत ठाकूर, सत्कारमुर्ती खा.धैर्यशिल पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, कोकण म्हाडा मा.सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, प्रभारी मोहनिष गायकवाड, कार्याध्यक्ष मोहन गायकवाड, सरचिटणीस मिलींद कांबळे, उपाध्यक्ष प्रभु जाधव, अध्यक्ष विजय पवार, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, मा.महापौर कविता चौतमोल, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, सरचिटणीस विजय मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला, खांदेश्वर अध्यक्ष दिनेश जाधव, अॅड.मंगेश धिवार, अंकुश साळवे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, मा.नगरसेवक संतोष शेट्टी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.रामदास आठवले यांनी सांगितले की, रामशेठ ठाकूर यांची माझी जुनी दोस्ती आहे. ते दानशुर व्यक्तीमत्व म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. आ.प्रशांत ठाकूर यांचे कार्य कौतुकास्पद असून आगामी सर्व निवडणुकीत ते आपल्याला निश्चितच चांगला वाटा देतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त करून कार्यकर्त्यांनी पदाच्या मागे न धावता समाजाचे काम करत रहावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण अंगीकारावी व समाजासाठी झटावे. आपोआप पदे आपल्याला मिळतील, असे त्यांनी स्वःअनुभवावरुन सांगितले. यावेळी त्यांनी स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्याचप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे पहिल्यापासून जवळचे संबंध असून दिल्लीत आम्ही रामदास आठवले यांच्या बरोबर काम केले आहे. त्यामुळेच आमचे संबंध भावासारखे घट्ट आहेत. प्रत्येक वेळी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्यांना योग्य ते स्थान प्रत्येक ठिकाणी कसे मिळेल हे आम्ही बघत असतो व येथील पदाधिकारी कार्यकर्ते कौटुंबिकरित्या आम्ही एकत्रित काम करीत असतो, असेही त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना आ.प्रशांत ठाकूर यांनी सुद्धा शासनाच्या विविध असणार्या योजना महाराष्ट्र शासन तसेच केंद्रामार्फत येथे राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तर कोकण म्हाडाचे मा.अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा आजचा कार्यक्रम हा महायुतीच्या आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटल्याचे त्यांनी सांगितले व एकसंघ राहून आपण निवडणूक जिंकू असे त्यांनी आश्वासित केले. तर सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित खा.धैर्यशिल पाटील यांनी सुद्धा रामदास आठवले यांनी मला दिल्लीत मार्गदर्शन करावे त्यांच्या कृपा छत्राखाली ठेवावे, जास्तीत जास्त केंद्राच्या योजना रायगड जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सुद्धा महायुतीमध्ये असताना आम्हाला शासनाच्या विविध पदभरतीमध्ये सामावून घ्यावे, निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी उपस्थितांकडे केली. तर पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी हा सभागृह पूर्ण खच्चून भरला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची ताकद कुठेही कमी झाली नाही, हे यावेळी दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात तरुणी पिढी या आपल्या पक्षाकडे वळत असून आगामी काळात एकदिलाने निवडणूक लढवून महायुतीचे सरकार आणू, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. तर कार्याध्यक्ष मोहन गायकवाड यांनी सुद्धा प्रास्ताविक करताना जिल्ह्यातील एकमेव असा ताकदीचा आपला पक्ष असून वेळोवेळी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळत असते. त्यांच्यामुळेच आज कार्यकर्ता सक्षम होत चालला आहे. शासन आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविते त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी रायगड जिल्ह्यातील तालुकाप्रमुखांसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अनेक तरुणांनी तसेच महिला आघाडीने पक्षप्रवेश केला. या निमित्ताने विशाल सावंत प्रस्तुत भीमगीतांचा सदाबहार नजराणा भीमपर्व या कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.
फोटो ः रामदास आठवले यांचा सत्कार