पनवेल रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षांची कोंडी लवकरच फुटणार ; शिवसेनेची यशस्वी बैठक..
                 शिवसेनेची यशस्वी बैठक....
पनवेल वैभववृत्त सेवा : - 
दोन दिवसांपूर्वी संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी पनवेल स्थानकाला भेट देत तिथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. त्याच वेळेस तिथे होणारी वाहतूक कोंडी, रिक्षा चालकांचा प्रश्न या संदर्भातही समस्या जाणून घेतल्या व शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना दोनच दिवसात बैठक घेऊन या विषयात तोडगा काढण्याचे आदेश दिले. यापूर्वीही तेथील रिक्षाचालक व अनेक प्रवासी यांनी शिवसेनेकडे वारंवार या विषयाचा पाठपुरावा केला होता. शहरप्रमुख प्रसाद सोनावणे यांनी अनेकदा भेट देऊन येथील प्रश्न सोडवण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे व रेल्वे प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला व अखेर काल प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात उपमानगरप्रमुख महेश सावंत, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, रेल्वेचे स्टेशन मास्तर श्री अग्रवाल, सीआरपीएफ च्या बाबर मॅडम, रेल्वे पोलीस चे निरीक्षक श्री पाडवी, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पाटील, परिवहन विभागाचे निरीक्षक श्री भाड, काही जागरूक प्रवासी, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी या सर्वांना एकत्रित करून एक यशस्वी बैठक संपन्न झाली त्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले - 
१) रेल्वे स्टेशनच्या आतील भागात रिक्षांना पूर्णतः जो मज्जाव केला होता ज्यामुळे प्रवाशांना 200 ते 300 मीटर चालत बाहेर यावं लागत होतं त्या ऐवजी आता सिंगल लेन मध्ये साधारण फक्त पंधरा रिक्षा आत मध्ये उभ्या राहतील व आतील 15 रिक्षा भरून एकाच रांगेत बाहेर पडल्यानंतर स्टेशनच्या बाहेर एका बाजूस पुन्हा सिंगल लेन मध्येच उभ्या असलेल्या उर्वरित रिक्षा 15 - 15 च्या टप्प्याने आत येतील. 
२) स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उभ्या असलेल्या इतर सर्व रिक्षा या सिंगल लेन पद्धतीने एका बाजूला उभे राहतील.
३) शहरातील प्रमुख ठिकाणांचे दर पत्रक निश्चित करून ते तिथे लावण्यात येईल.
४) रिक्षा चालक शक्यतो कोणतेही भाडे नाकारणार नाहीत. व प्रवाशांनी मीटर टाकण्याचा आग्रह केल्यास तो ही मान्य करतील.
५) परमिट नसलेल्या, लायसन्स नसलेल्या , बॅच नसलेल्या रिक्षा व रिक्षाचालक यांच्यावरती कारवाई होईल व त्या सर्व रिक्षा चालक सहकार्य करतील.
६) रिक्षा प्रवासाचे दर पत्रक व संबंधित अधिकाऱ्यांचे नंबरही तेथे डिस्प्ले करण्यात येतील.
७) अनेकदा अधिकाऱ्यांकडूनही होणारा कारवाईचा अनाठायी अतिरेक ते टाळतील.

सर्वच संबंधित शासकीय अधिकारी अशा पद्धतीने एका प्रश्नावर एकत्रित आल्याने तेथे उपस्थित प्रवासी, नागरिक, विशेष करून बहुसंख्येने असलेले रिक्षाचालक या सर्वांनीच खासदार श्रीरंग आप्पा बारणे, प्रथमेश सोमण, प्रसाद सोनावणे, महेश सावंत यांसह संपूर्ण शिवसेनेचे एका जटील प्रश्नात हात घालून तो यशस्वीरित्या सोडवण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याबद्दल अभिनंदन केले.
Comments