पनवेल शहर पोलिसांचे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केले कौतुक..
पनवेल शहर पोलिसांचे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केले कौतुक..
पनवेल, दि.7 (संजय कदम) ः अडचणीत असलेल्या तरुणाच्या मदतीस पनवेल शहर पोलिसांचे पथक त्वरित धावत जावून त्यांनी सदर तरुणाला तात्काळ मदत केल्याने या कामाची दखल घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात परिमंडळ 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वपोनि नितीन ठाकरे तसेच इतर 3 पोलीस कर्मचार्‍यांचे प्रशस्तीपत्रक देवून कौतुक केले आहे.
मुंबई येथे राहणारा एक तरुण हा लोणावळा परिसरात पिकनिकसाठी गेला होता. तेथून परतत असताना त्याची महत्वाची कागदपत्रे गहाळ झाली होती. या संदर्भात त्याला दोन दिवसांनी एक फोन आला व आमच्याकडे तुमची महत्वाची कागदपत्रे आहेत. ती तुम्हाला हवी असल्यास तुम्हाला 5 हजार रुपये रोख रक्कम द्यावी लागेल, असे सांगून त्याला पळस्पे येथील एका हॉटेलजवळ भेटीस बोलाविले. एवढी रक्कम त्या तरुणाकडे नसल्याने तसेच कागदपत्रे सुद्धा महत्वाची असल्याने त्यांनी इतर ओळखीच्या लोकांच्या आधारे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष किशोर वाझे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना याबाबतची माहिती दिली. किशोर वाझे यांनी त्या मुलाचा धीर वाढवून याबाबत त्यांनी पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानुसार तात्काळ सदर वेळी कर्तव्यावर असणारे पोलीस कॉन्स्टेबल दर्शन म्हात्रे, अक्षय वाघमारे, संजय चौधरी हे पळस्पे येथे गेले व त्यांनी सदर आलेल्या इसमांकडून पोलिसी खाक्या दाखवित ती सर्व कागदपत्रे या मुलाला परत मिळवून दिली. या पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने या तीन पोलीस कर्मचार्‍यांसह सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत व वपोनि नितीन ठाकरे यांचे विशेष कौतुक करून आभार मानले आहेत.



फोटो ः पोलीस बॉईज संघटना सत्कार
Comments