विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तीची कार्यशाळा..
पनवेल विभाववृतसेवा - : पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त तथा प्रशासक श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी पर्यावरण दक्षता मंच, पनवेल यांच्या सहकार्याने इंदुबाई वाजेकर इंग्रजी शाळेमधील ५ वी ते ७ च्या विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तीची कार्यशाळा घेण्यात आली.
महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावरती भर दिला जात आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने नागरिकांना सप्तसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. या सप्तसूत्रीमधील दुसरे सूत्र म्हणजे 'पुढील पिढ्यांना समृद्ध वारसा देण्याच्या दृष्टीने घरातल्या लहान मुलांच्या हस्ते गणेशमूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना करावी'. या सूत्राच्या अमंलबजावणीसाठी उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार पर्यावरण दक्षता मंच, पनवेल यांच्या सहकार्याने पनवेल येथील इंदुबाई वाजेकर इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन दिनांक १७ ऑगस्ट करण्यात आले.
तीन टप्प्यात होणाऱ्या या कार्यशाळेमध्ये या शनिवारी शाडू मााती मळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. येत्या पुढील दोन शनिवारी मूर्ती बनविणे आणि रंगविणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी महापालिकेचे पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, शाळेचे अध्यक्ष ही.सी.म्हात्रे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. याबरोबर तनय दीक्षित, स्मित राऊत, उल्हास ठाकूर, धनंजय मदन,प्रियांका रणदिवे आणि प्रल्हाद बोडके यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.