विविध कामगार संघटनांचा संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा ...
ही निवडणूक आपल्या अस्मितेची निवडणूक आहे - संजोग वाघेरे पाटील
 
विविध कामगार संघटनांचा संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा ...

कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या कामगार संघटना कार्यरत...

पनवेल / वार्ताहर : -
३३ मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना समाजाच्या सर्वच स्तरांतून भरघोस पाठिंबा मिळत आहे. पनवेल येथील विविध कर्मचारी संघटनांनी संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत अफाट शक्ती प्रदर्शन केले. कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या कामगार संघटना कार्यरत आहेत.
      स्वर्गीय कामगार नेते श्याम म्हात्रे यांनी असंघटित कामगारांना एकत्र करत विविध संघटनांची निर्मिती केली. त्यांच्या पश्चात त्यांची कन्या श्रुती म्हात्रे त्याच जोमाने या संघटना चालवत आहेत.कोकण श्रमिक संघ,व्यावसायिक विक्रेता संघ,गणेश मार्केट,बी एम टी सी कर्मचारी पुनर्वसन समिती,घरेलू कामगार संघटना,पनवेल हॉकर्स फेडरेशन,गणेश मंदिर ट्रस्ट,रिक्षा चालक संघटना,इमारत बांधकाम कामगार संघटना आदी संघटनांनी ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. त्यानंतर "संजोग वाघेरे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले. पनवेल येथील खांदा वसाहत येथील आगरी शिक्षण संस्थेच्या सभागृहात शुक्रवार दिनांक ३ मे रोजी हा मेळावा संपन्न झाला.
        मेळाव्याच्या मुख्य आयोजिका श्रुती श्याम म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. त्या म्हणाल्या की असंघटित कामगार वर्ग हा उपेक्षित आणि वंचित आहे. हा कामगार वर्ग आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. संजोगजी तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून आमच्या समस्या दिल्लीत जाऊन मांडाल असा आम्हाला विश्वास आहे. आमच्यातील छोट्या विक्रेत्यांसाठी १४ वर्षांपूर्वी युपीएच्या कालखंडामध्ये हॉकर्स लॉ पारित करण्यात आला होता. दुर्दैवानं त्यानंतर सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीने हा कायदा लागू केला नाही.आज प्रत्येक घराची गरज असणाऱ्या घरेलू कामगारांची कुठेही शासन दरबारी नोंद होत नाही, त्यांना कुठलेही कायद्याचे संरक्षण नाही, त्यांना कुठल्याही सुविधा नाहीत. या साऱ्यांसाठी आपल्याला भविष्यात काम करायचे आहे. खरंतर हातावर पोट असणाऱ्या या कामगार वर्गासाठी आज कामाचा दिवस आहे. परंतु आपल्याला पाठिंबा देण्यासाठी हे सारे जण मोठ्या उत्साहाने एक दिवसाच्या कमाईला तिलांजली देऊन या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. या साऱ्यांना मी विनंती करेन की संजोग वाघेरे पाटील यांच्या समोरील मशाल हे बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा.
          राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक अध्यक्ष महबूब शेख यांनी ओघवत्या शैलीमध्ये रोखठोक भाषण करत उपस्थितांची वाहवा मिळवली. ते म्हणाले की बारणे एकदा निवडून आले की परत तोंड दाखवायला सुद्धा येत नाहीत. या निवडणुकीत आपल्याला संविधान वाचवण्यासाठी मतदान करायचे आहे. कारण भारतीय जनता पार्टी जर पुन्हा निवडून आली तर आगामी भविष्यात देशात निवडणुका होणार नाहीत.मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझा जन्म सर्वधर्मसमभाव पाळणाऱ्या  देशामध्ये झाला. आपल्या देशात हिंदू बांधव भगवत गीतेप्रमाणे चालतात, मुसलमान बांधव कुराणा प्रमाणे चालतात, ख्रिस्ती बांधव बायबल प्रमाणे चालतात. परंतु भारतीय म्हणून आपण सगळे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो.आणि हेच संविधान बदलण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे. संजोग वाघेरे पाटील यांना मी गेली पंधरा वर्षे ओळखतोय. ते महापौर तर होतेच पण आमच्या पक्षाचे तिथले अध्यक्ष देखील होते. अत्यंत प्रशंसनीय असे त्यांनी काम करून दाखवले आहे. एक गोष्ट मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की "श्रीरंगासारखे ते रंग दाखवणारे नाहीत".
       जाहीर पाठिंबा देणाऱ्या संघटनांचे आभार मानताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले की आज तुमच्यासारख्या असंघटित कामगारांना फार त्रास सहन करावा लागत आहे. जर हीच मंडळी सत्तेमध्ये राहिली तर कामगारांचे भविष्य अंधकारात आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये कामगार कायद्यांच्यात हेतूपूर्वक बदल करण्यात आलेले आहेत. हे सारे बदल भांडवलदार धार्जिणे आहेत. पूर्वी एखादी कंपनी अथवा कारखाना बंद करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागे. परंतु आता मात्र तीनशे कामगार असलेला कारखाना मालक मनात येईल तेव्हा बंद करू शकतो. श्रुती ताईंनी फार मोठा संघर्ष केला आहे.कामगारांसाठी त्या सातत्याने कार्यमग्न असतात. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या आंदोलनामध्ये गेलो आहे तेव्हा तेव्हा त्यांना यश प्राप्त झाले आहे याचे मला समाधान वाटते.
         मेळाव्यासाठी विविध कामगार संघटनांचे प्रमुख पदाधिकारी,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी,  सी पी आय (एम),आर पी आय  (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया असे महाविकास आघाडी मधील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        या मेळाव्याला शेकाप चे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना ( उ बा ठा) जिल्हाप्रमुख शिरीष घरत,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत पाटील, युवक अध्यक्ष महबूब शेख, पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम गोकुळशेठ पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील,भावना ताई घाणेकर, शेकापचे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू,शेकाप च्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख अनुराधा ठोकळ, काँग्रेस पनवेल शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे,  माया अहिरे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस युवक अध्यक्ष हेमराज नाथाशेठ म्हात्रे,विधी व न्याय सेल चे जिल्हाध्यक्ष ऍड के एस पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र पाटील,
शिवसेना नेते शशिकांत डोंगरे,शिवसेना खांदा वसाहत शहर प्रमुख सदानंद शिर्के, दिपक घरत, दिपक निकम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या डॉक्टर सेलच उपाध्यक्ष डॉ. अमित दवे,नाना म्हात्रे,युवा सेनेचे औचीत राऊत,पराग मोहिते,शैबाझ पटेल, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

चौकट:
देशात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगारीचा निर्देशांक १०.८ % झाला आहे.
६ कोटी ९० लाख करोड लोकांचे रोजगार गेले आहेत. परंतु केंद्र सरकार फक्त जुमलेबाजी करण्यात मश्गूल आहे. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळेजण भारतीय जनता पार्टीत गेल्यावर मात्र पवित्र होतात.अजित पवार,सुनील तटकरे,छगन भुजबळ यांचे भाजपा सोबत घरोबा करण्याचे दाखले देऊन मेहबूब शेख म्हणाले की वो चले थे तवायफोंके कोठे बंद करने,सिक्को की खनक सुनकर खुद मुजरा कर बैठे... केंद्रीय यंत्रणांची स्वायत्तपणे मदत घेऊन विरोधकांना संपवायचा भाजपचा डाव आहे.आजचा भारतीय निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग झालाय.
-- मेहबूब शेख.
Comments