दहावी आणि बारावीच्या सीबीएसई परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची सुवर्ण कामगिरी ; १०० टक्के निकालाची परंपरा कायम...
 १०० टक्के निकालाची परंपरा कायम...   

पनवेल (प्रतिनिधी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने इयत्ता दहावी व बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यशाच्या बाबतीत पुन्हा एकदा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने बाजी मारली असून १०० टक्के यशाची परंपरा कायम ठेवत सुवर्ण यश संपादन केले आहे. दहावीच्या परिक्षेत अनन्या अरोरा या विद्यार्थिनीने तब्बल ९८. ६० टक्के, बारावी सायन्स परीक्षेत हर्षिता जारोंडे हिने ९७. ६० टक्के आणि बारावी कॉमर्स परीक्षेत सुविजय सरकारने ९५. ४० टक्के  गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावित विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. 
               दहावीच्या परिक्षेसाठी विद्यालयातील २७६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये अनन्या अरोरा हिने ९८. ६० टक्के, पाल पटेल ९७. ६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, ओजस पवार, अखिल दुबे आणि राशी अहाटे या तिघांनी प्रत्येकी ९७. ४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. ८९ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले. तसेच आर्टिफिशियल इंटिलिजिएन्स अर्थात ए. आय. आणि डेटा सायन्स मध्ये १५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून नैपुण्य मिळवले. त्याचबरोबर गणित विषयात चार आणि सोशिअल सायन्समध्ये दोन विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले. 
           सीबीएसई इयत्ता बारावीच्या निकालातही रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या विद्यार्थांनी उत्तुंग कामगिरी केली आहे. या परिक्षेसाठी १६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये सायन्सचे १३४ तर कॉमर्सचे ३४ विद्यार्थी होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून बारावीचा निकालही १०० टक्के लागला आहे. यामध्ये ६२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. सायन्स मध्ये हर्षिता जारोंडे हिने ९७. ६० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, रुद्रेश मोहोपात्रा याने ९७ टक्के गुण मिळवत द्वितीय, तर हर्षित कांडपाल आणि प्रिशा गुप्ता यांनी प्रत्येकी ९६. ४० गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला.  कॉमर्समध्ये सुविजय सरकारने ९५. ४० टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक, ९४. २० टक्के गुण प्राप्त करत संजना सिसोदिया हिने द्वितीय तर अनुस्मृती पॉल हिने ९३. ६० टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. 
    शैक्षणिक क्षेत्रात कायम उज्ज्वल कामगिरी करणारे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे, त्यामुळेच या शाळेने यशाची परंपरा अखंडित ठेवली आहे.   या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
Comments