मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय महिलेचे प्राणघातक संकट टाळले ; गुंतागुंतीच्या हर्नियावर केले यशस्वी उपचार
नवी मुंबई / पनवेल वैभव - : अनेक वर्षांपासून जटिल हर्नियामुळे त्रस्त असलेल्या ७५ वर्षीय महिलेला नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रियेनंतर नवे जीवन मिळाले आहे. वारंवार शस्त्रक्रिया करुनही बरी न होणारी ही हर्नियाची समस्या अखेर प्रगत उपचारांमुळे पूर्णपणे दूर करण्यात डॅाक्टरांना यश आले आहे.
नवी मुंबईत राहणाऱ्या श्रीमती सुरेखा पाटील (नाव बदलले आहे) यांच्या पोटात मागील शस्त्रक्रियेच्या जागी मोठी सूज आढळून आली होती. ही सूज हळूहळू वाढत गेल्यामुळे त्यांना चालणे, बसणे तसेच दैनंदिन कामं करणे देखील अवघड झाले होते. याआधी तीन वेळा हर्नियाची शस्त्रक्रिया होऊनही सूज पुन्हा येत असल्याने त्या शारीरिक व मानसिकदृष्ट्या खूप खचून गेल्या होत्या.
वैद्यकिय तपासणीत पोटाच्या भिंतीत सुमारे १८ सेंटीमीटरचा मोठी गाठ आढळून आली. पोटातील काही अवयव बाहेरच्या दिशेने सरकले होते. या स्थितीमुळे भविष्यात गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. रुग्णाचे वय आणि आजाराची तीव्रता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
मेडिकव्हर हॉस्पिटलमधील गॅस्ट्रो-इंटेस्टिनल (जीआय) आणि हर्निया शस्त्रक्रियेत तज्ज्ञ असलेल्या डॉ. नितीन तवटे, डॉ. चिराग वजा आणि डॉ. सारंग बाजपेयी यांच्या टीमने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या शस्त्रक्रियेत पोटातील सर्व अवयव त्यांच्या योग्य जागी बसवण्यात आले आणि पोटाची भिंत मजबूत करण्यात आली. भविष्यात हर्निया पुन्हा होऊ नये यासाठी विशेष जाळी देखील बसवण्यात आली.
डॉ. नितीन तवटे(गॅस्ट्रो-इंटेस्टिनल (जीआय) आणि हर्निया शस्त्रक्रिया सर्जन, मेडिकव्हर हॉस्पिटल) सांगतात की, इन्सिजनल हर्निया म्हणजे आधी झालेल्या शस्त्रक्रियेच्या जागी पोटाच्या भिंतीतील कमकुवत भागातून आतले अवयव बाहेर येणे. या रुग्णामध्ये हर्निया वारंवार होण्यामागे अनेक कारणे होती. यामध्ये पूर्वी झालेल्या अनेक शस्त्रक्रिया, वाढते वय, स्नायूंची बळकटी कमी होणे आणि उपचारांना झालेला विलंब यांचा समावेश होता. वारंवार होणाऱ्या हर्नियामध्ये केवळ साधी शस्त्रक्रिया पुरेशी ठरत नाही. हे प्रकरण अतिशय आव्हानात्मक होते, कारण पोटाची भिंत खूप कमजोर झाली होती आणि पोटातील अवयव हळूहळू बाहेरच्या दिशेने सरकले होते. आमचे मुख्य उद्दिष्ट हे सर्व अवयव सुरक्षितपणे पुन्हा पोटात बसवणे आणि पोटाच्या भिंतीला दीर्घकाळ टिकणारी मजबुती देणे हे होते.
डॉ. चिराग वाजा आणि डॉ. सारंग बाजपेयी ( जीआय आणि हर्निया सर्जन) सांगतात की, पहिल्या टप्प्यात पोटाचे ताणलेले स्नायू सैल करण्यासाठी बोटॉक्स इंजेक्शन देण्यात आले. त्यामुळे पोटावरील ताण कमी झाला आणि पुढील शस्त्रक्रियेसाठी शरीर तयार झाले. दुसऱ्या टप्प्यात पोटाची पोकळी हळूहळू वाढवण्यात आली, जेणेकरून अवयवांवर अतिरिक्त दाब न पडता त्यांना सुरक्षितपणे आत बसवता येईल. शेवटच्या टप्प्यात पोटाच्या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली. यासाठी मोठ्या आकाराची जाळी बसवण्यात आली, ज्यामुळे पोटाला दीर्घकालीन आधार मिळाला आणि हर्निया पुन्हा होण्याचा धोका कमी झाला. सुमारे चार तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आणि त्यानंतर रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली.
डॉ. तवटे पुढे सांगतात की, शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण चालू लागल्या. काही दिवसांत त्यांना सामान्य आहार देण्यात आला आणि पाच दिवसांत त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिरावली असून त्या हळूहळू दैनंदिन जीवनात परतत आहेत.हर्नियाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रुग्णाला १ ते १.५ महिने पोटाला पट्टा वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रुग्ण श्रीमती सुरेखा पाटील म्हणाल्या, मी अनेक वर्षांपासून खूप त्रास सहन करत आहे. अनेक शस्त्रक्रिया करुनही पाहिजे तसा आराम मिळत नव्हता. मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी मला पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याची संधी दिली आणि मी त्यांचे मनापासून आभार मानते.
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे केंद्रप्रमुख संदिप जोशी सांगतात की, वरील प्रकरणातून मेडिकव्हर रुग्णालय गुंतागुंतीच्या व वारंवार कराव्यात लागणाऱ्या शस्त्रक्रियेच्या समस्या तज्ज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांनी यशस्वीपणे सोडवू शकते, हे स्पष्ट होते.अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि योग्य नियोजनाच्या मदतीने अशा गुंतागुंतीच्या आजारांवरही यशस्वीपणे मात करता येते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.