खारघर मध्ये आदित्य ठाकरे यांच्या रोड-शोला तुफान प्रतिसाद ...
खारघर मध्ये आदित्य ठाकरे यांच्या रोड-शोला तुफान प्रतिसाद 

पनवेल/ दि.०९ ( वार्ताहर)
आत्तापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर हाती येणारे अंदाज पाहता इंडिया आघाडीकडे मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे ४०० तर सोडा, २०० पार जाणं सुद्धा भारतीय जनता पार्टीला कठीण असेल असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पनवेल येथे रोडशोसाठी आले असता म्हणाले. ते ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आले होते.पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर येथून आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला प्रारंभ करण्यात आला. महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांचे झेंडे लावत भव्य मोटार सायकल रॅली काढली होती.
           भव्य मोटार सायकल रॅली आणि रोड-शो सुरू होण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. आमचे मावळ मतदार संघातील भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांना भेटण्यासाठी मी आलो आहे असं म्हणत त्यांनी वार्तालापास प्रारंभ केला. ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीला जेव्हा समोर पराभव दिसू लागतो किंवा ते जेव्हा जेव्हा अडचणी येतात तेव्हा तेव्हा ते देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करतात. जातीयवाद उफाळून आणतात किंवा प्रांतवाद निर्माण करतात. परंतु देशासमोर महागाई आणि बेरोजगारी हे दोन महत्त्वाचे मुद्दे असताना त्याबद्दल ते चकार शब्दही काढत नाहीत. 
             पियुष गोयल यांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की दहा वर्षांनी का होईना परंतु पियुष गोयल यांना महाराष्ट्राची आठवण झाली हे आपले नशीबच समजायचे. त्यांच्याकडे अर्थ, रेल्वे अशी महत्त्वाची खाती होती परंतु त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासाठी काहीही केले नाही. आज देशातील रेल्वे स्थानकांची नावे बदलली जात आहेत परंतु परिस्थिती मात्र अजिबात बदललेली नाही. पियुष गोयल यांनी महाराष्ट्र हिताचे एखादे जरी काम केले असेल तरी ते मला सांगा. कोरोना काळामध्ये २३ मार्च रोजी परप्रांतातील मजदूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी रेल्वे गाड्या सुरू करा असा आम्ही आक्रोश करत होतो. तेव्हा या महाशयांना महाराष्ट्राकडे बघण्याची सवड नव्हती. 
            महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेण्याच्या विषयावर देखील आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि मित्र पक्षांवर तोंडसुख घेतले. ते म्हणाले की अगदी जून २०२२ पर्यंत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना असं वाटत होतं की वेदांता फॉक्सकोन महाराष्ट्रातच राहील. त्यांनी एखाद्या कॉन्ट्रॅक्टर प्रमाणे वक्तव्य केले होते. कारण त्यांच्या आजूबाजूला नेहमी कॉन्ट्रॅक्टर असतात. तळेगाव येथे होणारा हा प्रकल्प पुढे गुजरातला गेल्यानंतर तो देशाबाहेर निघून गेला. 
         देशात सुरू असलेल्या हुकूमशाही बद्दल देखील त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की जेव्हा जेव्हा तुम्ही सत्य मांडायचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यावरती गुन्हे दाखल होतात. उद्या जर का तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एखादी सत्यवादी बातमी लिहीलीत तर ही मंडळी पत्रकारांवर देखील गुन्हे दाखल करतील. 
            आदित्य ठाकरे यांची युवा पिढीमध्ये एक क्रेझ आहे. आदित्य ठाकरे यांच्या रोडशोला खारघर मध्ये न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद लाभला. फार मोठ्या संख्येने नागरिक त्यांना अभिवादन करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. यामध्ये तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांच्या समवेत शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन भाऊ अहिर, जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेस पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम गोकुळ शेठ पाटील,शिवसेना पनवेल विधानसभा संपर्कप्रमुख वैभव सावंत, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख कल्पना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image