पनवेल महानगरपालिकेचा आजवरील सर्वाधिक वसुलीचा विक्रम..
कर विभागाची एका वर्षात ३६० कोटीची वसुली
पनवेल,दि.१: पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर  विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३६० कोटींची वसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे.आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाने गेले वर्षभर नियोजनबध्द पध्दतीने रूपरेषा आखून वसूलीचा हा विक्रम केला आहे. मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त गणेश शेटे यांच्या नियंत्रणाखाली योग्य उपाययोजना राबवत एकुण ६४७ कोटी इतका महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
नुकत्याच झालेल्या सुनावणीनूसार मा. उच्च न्यायालयाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस पालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नाही.त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आली आले आहे. 

गेल्या महिनाभरात मालमत्ता कर विभागाचे सहाय्यक आयुक्त  स्वरूप खारगे व कर अधिक्षक महेश गायकवाड व सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली चारही प्रभागामंध्ये मार्च महिना संपेपर्यंत कर्मचाऱ्यांनी  नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी कोणतीही सुट्टी न घेता  शनिवार , रविवारी देखील कार्यालये सुरू ठेवली. पालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यवसायिक मालमत्ता करधारकांडून पालिकेने वसुलीची थेट कारवाई सुरु केली. या वसुलीसाठी महापालिकेच्यावतीने यावेळी १७ पथके तयार केली होती. प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही पथके सर्व प्रभागांमध्ये वसुलीसाठी जात होती. याचबरोबरीने मालमत्ता कर अतिरिक्त भारत राठोडही या पथकासोबत प्रत्यक्ष वसुलीच्या कामामध्ये सहभागी झाले होते. 

विकास कामे करण्यासाठी महापालिकेकडे मालमत्ता कर हे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असल्याकारणाने वेळोवेळी सावध पाऊले उचलली . पनवेल महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी  गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेने सिडको हस्तांतरीत भाग, एमआयडीसी, मार्बल मार्केट, जवाहर औद्योगिक वसाहत अशा भागांमध्ये व्यवसायिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरु केली  आहे. ज्या थकबाकीदारांना जप्ती नोटीसा दिल्या होत्या यांना आता वॉरंट नोटीसा देण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.  तसेच अटकावणीच्या मोहिमेलाही सुरूवात करण्यात आली आहे. याचा थकबाकीदार यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. परिणामी मालमत्ता करांमध्ये भरघोस वाढ होताना दिसली. मार्च महिन्यात एकुण ५२ कोटीची वसुली झाली, त्यामध्ये ३० मार्च या एकाच दिवशी १२ कोटीची विक्रमी वसुली झाली. तसेच आज ३.६० कोटीची उच्चांकी वसुली झाले आहे. एकुणच गेल्या वर्षभर मालमत्ता कर विभागाने घेतलेल्या कष्टाचे फळ म्हणजे यावर्षी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ३६० कोटींची सर्वाधिक वसुली महापालिकेने केली आहे.

वेळोवेळी महापालिकेने मालमत्ताधारकांच्या आक्षेप व हरकतीनूसार त्यांच्या बिलात सुधारणा करुन दिली आहे. याचबरोबर यापुढेही  मालमत्ताधारकांना त्यांच्या बिलाबाबत कोणत्याही हरकती किंवा सूचना असल्यास त्यानूसार त्यांच्या बिलात सुधारणा करण्याची भुमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सूचना किंवा आक्षेप असल्यास तो नोंदवावा आणि आपला मालमत्ता कर भरून पनवेलच्या विकासास हातभार लावावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
Comments