अभियानातून नागरिकांशी साधणार व्यापक संवाद..
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीतर्फे दिनांक ०४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी 'गाव चलो अभियान' सुरु झाले आहे. यात भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार असून ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी आज (दि. ०६) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या अभियानाच्या अनुषंगाने सरकारी योजनेतील लाभार्थी, बचत गट, धार्मिक स्थळांना भेट, नैपुण्य प्राप्त विद्यार्थी व खेळाडू, भाजप जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, समाज क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व अशा सर्वांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांना पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले कि, उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा कार्य करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या १० वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. सेवाव्रत हे भाजपचा मूळ अंग असून मोदीजींची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या १० वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रकेही यावेळी वितरित करण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर या अंतर्गत ५० हजार युनिट्समध्ये भाजपाचे ५० हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि.प सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी राज्यभरातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करतील व त्यांना ३२ हजार सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल. प्रत्येक युनिटमध्ये भाजपाचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली १८ संघटनात्मक कामे करणार आहेत. या अभियानांतर्गत एका लोकसभेत साधारण साडेतीन लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच लवकरच पंतप्रधान मोदी हे शक्तिवंदन कार्यक्रमाद्वारे महिला बचत गट प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट- 'गाव चलो अभियान' अंर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा येथे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा (ता. कळमेश्वर), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती जिल्ह्यातील साऊर येथे, केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे विलेपार्ले येथे, मावळचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर पनवेल तालुक्यातील नेरे येथे, आमदार महेश बालदी न्हावे येथे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील मावळ विधानसभेतील तुंगार्ली येथे, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील खारघर येथे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी खालापूर तालुक्यातील चौक येथे, तर पनवेल तालुकाध्यक्ष महानगरपालिका हद्दीतील प्रभाग ९ येथे एक दिवस राहणार आहेत. तसेच मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे गुरामवाडी (ता.मालवण), रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथे एक दिवस मुक्कामास जाणार आहेत. पीयूष गोयल, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील हे केंद्रीय मंत्रीही या अभियानात सहभागी होणार आहेत.तसेच शहरी भागात वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाणार आहे.