पनवेल शहर पोलिसांची वडाळे तलाव परिसरात कर्कश आवाजाने गाडी चालविणार्‍यांवर कारवाई..

मोटार सायकल व चारचाकी गाड्यांवर कारवाई

पनवेल वैभव, दि.20 (संजय कदम) ः पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरात रात्रीच्या वेळी अनेक दुचाकीस्वार कर्कश असे सायलेंन्सर द्वारे आवाज काढून गाड्या चालवितात त्याचप्रमाणे वाढदिवस व इतर कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी साजरे करताना चार चाकी गाड्यांमध्ये स्पीकरवर मोठमोठ्याने गाणी लावतात, अशांवर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कारवाई केली आहे.
याबाबतच्या अनेक तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात परिसरातील नागरिकांनी केल्या होत्या. त्याचप्रमाणे अशा घटनांमुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत होता व या कर्कश आवाजाचा त्रास प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना होत होता. याबाबत वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जुईकर व गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी गस्त घालून अशा प्रकारे कर्कश आवाजाने मोटार सायकल चालविणार्‍या दोन मोटार सायकलींवर त्याचप्रमाणे एका चार चाकी वाहनांना ताब्यात घेवून त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात दंडात्मक कारवाई करून याबाबतची माहिती पनवेल वाहतूक शाखेला पुढील कारवाईकरिता दिली आहे. यापुढे सुद्धा अशा प्रकारे कारवाया पनवेल शहर परिसरात सुरूच राहणार असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांनी दिली.फोटो ः कारवाई केलेली वाहने
Comments