खाकी वर्दीतील कौटुंबिक कलेला 'प्रशस्ती' जल्लोष २०२३ मधील सहभागी कलाकारांचा सन्मान ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन..
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन...


पनवेल दि.२४ (वार्ताहर): नवी मुंबई पोलिसांच्या वतीने जल्लोष खाकी वर्दीतील दर्दींचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील कलाकार सदस्यांचा बुधवारी आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. या सर्वांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. अशाच प्रकारचे कार्यक्रम उपक्रम पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांकर्ता राबविण्यात येणार असल्याची ग्वाही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली.
                   पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचा कुटुंबातील सदस्यांच्या त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्याचा संकल्प नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केला. पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना येणारा ताण तणाव त्यातून काहीसं बाहेर पडावा हाही त्या पाठीमागचा उद्देश होता. त्यानुसार दीपावलीच्या अगोदर एक सुंदर सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता.  सेलिब्रेटी आणि प्रोफेशनल कलाकारांची येथे कला सादर करण्याऐवजी नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर त्यांचा कुटुंबातील व्यक्तीच कलाविष्कार सादर करतील अशी वेगळी कल्पना आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मांडली आणि ती सत्यात सुद्धा उतरवली.डिवाइनर प्रोडक्शनचे प्रमुख निशिकांत सदाफुले,निहारिका सदाफुले यांनी 'जल्लोष वर्दीतील दर्दीचा' हा कलाविष्काराचा कार्यक्रम दिग्दर्शित केला. वाशी येथील सिडको हॉलमध्ये पोलीस आणि त्यांच्या कुटुंबातील कलाकारांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण करून एखाद्या रियालिटी शोला लाजवेल असा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. मराठी सिने कलाकार स्वप्निल जोशी यांनी उपस्थित राहून खाकी वर्दीतील कलेला प्रोत्साहन आणि पाठबळ दिले. दरम्यान जल्लोष 2023 मध्ये सहभागी झालेल्या कलाकारांना बुधवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.   पोलीस आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींमधील सुप्त गुण ओळखून त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा मानस पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केला. विशेषतः पोलीस पत्नी मुलं आणि मुलींना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याची माहिती जमा करण्यासाठी चॅम्पियन नियुक्त करण्यात आल्याचेही आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.




फोटो: सत्कार
Comments