गायक राहुल देशपांडे यांच्यासोबत दादर बीचवर रंगली सुगी परिवाराची सुरमयी दिवाळी पहाट..
  सुगी परिवाराची सुरमयी दिवाळी पहाट..


मुंबई / 15 नोव्हेंबर, 2023:- मुंबईतील प्रथितयश व आघाडीचे विकासक सुगी डेव्हलपर्स यांच्या सुगी परिवाराने दादर बीचवर आयोजित केलेल्या प्रसिद्ध गायक श्री राहुल देशपांडे यांच्या पहाट दादरकरांसह अनेक मुंबईकरांची दिवाळी पहाट संस्मरणीय केली. नरक चतुर्दशीला सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील पार्क क्लब येथे दादरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने रंगलेल्या या मैफिलीत राहुल देशपांडे यांनी सादर केलेल्या सुरावटींनी रसिकांची दिवाळी पहाट सुरमयी झाली.  

श्री राहुल देशपांडे यांनी पहाटेच्या वेळी गायल्या जाणाऱ्या रागाने सुरूवात करीत सुर छेडले व त्यावर कडी करीत अहिर भैरव रागातील 'अलबेला सजन आयो रे' तसेच 'तुज मागतो मी आता', 'देव देव्हाऱ्यात नाही' इत्यादी भक्तीगीते, नाट्यगीते व भावगीते यांची पेशकश करीत 'कानडा राजा पंढरीचा' या   भक्तीगीताने वातावरण विठ्ठलमय केले. गायिका आर्या आंबेकर हिनेही आपल्या सुमधुर स्वरांनी राहुल देशपांडे यांना उत्तम साथ देत काही गाणी सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी रंगभूमीवरील अभिनेते आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कविता कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असलेले कवी संकर्षण कर्‍हाडे यांनी  केले. 
 
प्रेक्षकांना दिवाळी पहाटच्या शुभेच्छा देताना, सुगी ग्रुपचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार श्री निशांत देशमुख म्हणाले, “सुगी परिवाराच्या या मैफिलीने मुंबईकरांना दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी सर्वोत्तम सांस्कृतिक मेजवानी दिली. आपली संस्कृती, परंपरा आणि वारसा जतन करण्यासाठी सुगी परिवार नेहमीच प्रयत्नशील असतो; जेणेकरून सांस्कृतिकदृष्ट्या एक समृद्ध समाज निर्माण होईल. आम्ही मुंबईतील आणि विशेषतः दादरमधील सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये आमच्या सुगी परिवाराचे एक विस्तारित कुटुंब म्हणून या मैफिलीच्या निमित्ताने  आनंद वाटण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमात लहान मुलेही आपल्या पालकांसोबत तितक्याच उत्साहाने सहभागी झाल्याने आपल्या समृद्ध सांस्कृतिक मूल्यांचा पुढच्या पिढीवर संस्कार करण्याकामी या उपक्रमाचा नक्कीच फायदा होईल."
Comments