धारदार शस्त्राने मित्रावर हल्ला करणारा सराईत गुन्हेगार गजाआड..
            सराईत गुन्हेगार गजाआड...

पनवेल दि.२० (संजय कदम) : बारमध्ये कोणी बिल भरावे याच्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने आपल्याच मित्रावर त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.         
                तन्मय कवतेकर (वय ३८, रा.पनवेल) असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर यापूर्वीसुद्धा अनेक प्रकारची गुन्हे दाखल असून त्याच्यावर तडिपारीची कारवाई करण्यात आली होती. मात्र असे असतानाही पोलीस आदेशाला न जुमानता तो आपल्या पनवेलमधील मित्रांना भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर बारमध्ये जाण्यासाठी ते निघाले असताना तेथे बिल भरण्याच्या नादातून त्याचा मित्रांसोबत बाचाबाची झाली. या रागातूनच त्याने त्याचा मित्र हुसेन अमीर शेख (वय ३८) याच्यावर त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने वार केले. या घटनेची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळताच त्याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षद जुईकर, पोलीस हवालदार बोरसे, शैलेश जाधव, पोलीस शिपाई दीपक मोटे आदींच्या पथकाने सदर आरोपीला ताब्यात घेतले तर जखमी हुसेन शेख याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Comments