करंजाडे वासियांना मुबलक पाणी न दिल्यास सिडको कार्यालयात घागर उताणी करण्याचा निर्धार ; जल आक्रोश मोर्चाने सिडको अधिकारी धास्तावले....
जलआक्रोश मोर्चाने सिडको अधिकारी धास्तावले....


पनवेल दि.२८(वार्ताहर): श्रावण महिना सुरू असून, सणांची रेलचेल असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणाऱ्या गोकुळाष्टमीनिमित्त तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा! हे सूर सगळीकडे अडवू लागतील. पण दुर्दैवाने करंजाडे वसाहती मधील नागरिकांच्या घागरी गेल्या कित्येक आठवड्यांपासून यापूर्वीच उताण्या झालेल्या आहेत,अनेक आंदोलने करून सुद्धा सिडको प्रशासन रिकाम्या घागरी भरण्यास उत्सुक नाही.अखेरीस संयमाचा अंत झाल्यामुळे येथील नागरिकांनी आज सिडको कार्यालयावर धडक दिली व येत्या ८ दिवसात मुबलक पाणी न दिल्यास सिडको कार्यालयात घागर उताणी करण्याचा निर्धार त्यांनी केल्याने सिडको अधिकारी चांगलेच धास्तावले होते.  
      
दरम्यान आय लव करंजाडे या सेल्फी पॉइंट येथे आज सकाळी सगळे संतप्त नागरिक एकवटले व तेथून सीबीडी बेलापूर येथील सिडको मुख्यालयावरती मोर्च्या काढण्यात आला. या मोर्च्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, मा.आमदार मनोहरशेठ भोईर, पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती राजेंद्र पाटील, मा.नगरसेवक गणेश कडू,  मा. सरपंच तथा आयोजक रामेश्वर आंग्रे, माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी, नंदकुमार मुंडकर, गौरव दादा गायकवाड, संदिप चव्हाण, निखिल भोपी, चंद्रकांत पाटील, सचिन केणी, समाजसेवक राम पाटील ,मंगेश बोरकर, किरण पवार, संतोष पाडेकर, सुधाकर ननावरे, उमेश भोईर, योगेश राणे, केतन आंग्रे, सईद दादन , नीलिमा भगत, हेमा गोटमारे, अर्चना रसाळ, आशा केरेकर, अर्चना बनावली, मधुरा पाथरे यांच्यासह शेकडो संतप्त रहिवासी या जल आक्रोश मोर्च्यात रिकाम्या कळश्या व हांडे घेऊन सहभागी झाले होते. 
करंजाडे सेक्टर ५ अ आणि सेक्टर ६ येथील नागरिक अक्षरशः घरे विकून अन्यत्र स्थलांतरित होऊ लागले आहेत. अन्य सेक्टरमध्ये देखील कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली करंजाडे वसाहती मधील नागरिक एकवटे होते. १८ एम एल डी पाण्याची आवश्यकता असून देखील सिडको अवघी 12 ते 13 एमएलडी पाणी प्रतिदिन पुरविते. त्यातही नियोजन नसल्यामुळे काही सेक्टरना मुबलक पाणी मिळते तर बाकीच्या सेक्टर्समधील घागरी अक्षरशः रिकाम्या आहेत. दरम्यान या मोर्च्याला सामोरे जाताना सिडको अधिकाऱ्यांनी येत्या ८ सुरळीत पाणी पुरवठा करू असे आश्वासन दिले. तसेच तो पर्यंत टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जाईल असे अशी माहिती दिली


कोट:- 
टँकर ने पाणी पुरवठा करण्यापेक्षा करंजाडेवासियांना पाणी लवकरात लवकर मुबलक प्रमाणात अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरून सिडकोला याचा जाब विचारू - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील

सिडकोने फक्त मुबलक पाणी पुरवण्याचे आश्वासन देऊ नये तर प्रत्यक्षात कृती करावी व या पुढे पाण्याबाबतीत सिडको करीत असलेले राजकारण चालू देणार नाही - 
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख शिरीष घरत

सिडकोने वसाहत उभारण्या पूर्वी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असतानाही तश्या प्रकारचे नियोजन न कल्याने आज ही पाणी टंचाईची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. आता फक्त पाण्याचे पाईप लाईन टाकली आहे प्रत्यक्ष जोडणी व पाणी पुरवठा कधी करणार हा सवाल सिडकोच्या अधिकाऱ्यांना आहे- मा.सरपंच रामेश्वर आंग्रे 

फोटो : जल आक्रोश मोर्च्या
Comments