२०१६ पासून खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून केली अटक...
 पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून केली अटक...

पनवेल दि.११ (संजय कदम) : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्या पासून अद्याप न सोडवलेल्या प्रकरणांचा गुंता सोडवण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी योजनाबद्ध नियोजन करून खुनाप्रकरणी २०१६ सालापासून आपले अस्तित्व लपवून राहणाऱ्या आरोपीला अविरत प्रयत्नाने शोधून काढत त्याला अटक केली आहे. 
             आरोपी नगीना उर्फ चंकी पांडे (रा. उत्तर प्रदेश) हा २०१६ साली एक खून करून तो गुन्हा घडल्यापासून ते आजपावेतो अशी गेली 6 ते 7 वर्ष आपले अस्तित्व लपवून राहत होता. सदर आरोपीचे कोणतेही छायाचित्र अथवा त्याचा संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने त्याला शोधणे व त्याचा ठावठिकाणा काढणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. मात्र पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी योजनाबद्ध नियोजन करून या आरोपीचा माग घेतला असता सदर आरोपी हा त्याची उत्तरप्रदेश मधील बरया या गावी आपले अस्तित्त्व लपवून अतिशय दुर्मिळ तसेच डोंगरी भागात राहत असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पो.उप.नि अभयसिंह शिंदे, पो.हवा परेश म्हात्रे, पो.ना रवींद्र पारधी,पो. शि साईनाथ मोकळ यांचे पथक तयार केले. या पथकाने अथक प्रयत्नाने वाराणसी येथील स्पेशल टास्क फोर्स व स्थानिक हलिया पोलीस यांच्या सहाय्याने आरोपी नगीना उर्फ चंकी पांडे याला त्याच्या सासुरवाडी बरया येथून ताब्यात घेतले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्या पासून अद्याप न सोडवलेल्या प्रकरणांचा गुंता सोडवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या योजनाबद्ध नियोजन आणि नेटवर्कमुळे पनवेल शहर पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत आहे. 
फोटो : फरार आरोपीसह पनवेल शहर पोलीस
Comments