दारू विक्रेत्याजवळ चुगली केल्याच्या वादातून इसमाचा खून; मानपाडा पोलिसांकडून आरोपींना २ तासात अटक..
पोलिसांकडून आरोपींना २ तासात अटक..

पनवेल दि.२७ (संजय कदम) : दारु विक्रेत्याजवळ चुगली केली म्हणून डोंबिवली जवळील सोनारपाडा गावात एका इसमाची हत्या करून त्याच्या आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी इमारतीच्या मागील खिडकीतून बाहेर फेकणाऱ्या दोन इसमांना मानपाडा पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना अत्यंत शिताफीने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने अवघ्या दोन तासात अटक केली. 
  राजेश रामवृक्ष सहाने उर्फ केवट (३८, रा. तिवारी टोला, भटन ददन,देवारिया, उत्तरप्रदेश) असे मयत इसमाचे नाव आहे. राजेश हा डोंबिवली शहरात मिळेल त्या ठिकाणी बिगारीचे काम करीत होता व त्यास मिळेल त्या ठिकाणी तो झोपत होता. तो दादु मटु जाधव उर्फ पाटील (४५, रा. साईश्रध्दा इमारत, गावदेवी मंदिरा समोर, सोनारपाडा, डोंबिवली पूर्व) याचेसह कधी कधी दारु पित होता. राजेश याने ते दारू पित असलेल्या ठिकाणी आरोपी दादु जाधव व विनोद पडवळ (सोनारपाडा) यांच्याविरुद्ध चुगली केली. हि गोष्ट दोघांना समजल्यावर त्यांनी संगनमत करून त्याला दादू जाधवच्या साईश्रध्दा बिल्डींगमधील खोलीत नेले. तेथे त्यास दारुवाल्यास चुगली का करतो यावरुन त्यांच्यात वाद झाला. व त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याने दादु जाधव व विनोद यांनी लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने राजेशला मारहाण केली. या मारहाणीत राजेश याचा जागीच मृत्यू झाला. तो काही हालचाल करीत नसल्याचे पाहुन त्यांनी खिडकीमधुन बिल्डींगचे खाली राजेशचा मृतदेह फेकुन दिला. दुसऱ्या दिवशी साई श्रध्दा इमारतीच्या खाली एक इसम मृत अवस्थेत पडल्याचे रहिवाशांना दिसले. तात्काळ ही माहिती पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली. वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनिरी. गुन्हे बाळासाहेब पवार, पोनिरी. अतुल लंबे, सपोनि अविनाश वनवे, सपोनिरी सुरेश डांबरे, सपोनिरी सुनिल तारमळे, सपोनिरी श्रीकृष्ण गोरे, पोहवा राजकुमार खिलारे, पोहवा शिरीष पाटील, पोहवा सुनिल पवार, पोहवा दिपक गडगे, पोहवा विकास माळी, पोना शांताराम कसबे, पोना प्रविण किनरे, पोना यलप्पा पाटील, पोना देवा पवार, पोना अनिल घुगे, पोशि अशोक आहेर, पोशि विजय आव्हाड, पोशि विनोद ढाकणे, पोशि महेंद्र मंजा आदींच्या पथकाने तपास सुरु केला असताना तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने सदर हत्या हि आरोपी दादु जाधव व विनोद पडवळ यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनी चुगली केल्याच्या रागातून त्याची हत्या केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनिरी अतुल लंबे हे करीत आहेत.
फोटो : आरोपींसह मानपाडा पोलीस
Comments