जनावरांच्या मांसाने भरलेला टेम्पो जप्त....
जनावरांच्या मांसाने भरलेला टेम्पो जप्त....पनवेल दि.२०(वार्ताहर): बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची कत्तल करुन टेम्पो मधून सुमारे ३५० किलो वजनाचे मुंबईमध्ये नेले जाणारे जनावरांचे मांस पकडण्याची कारवाई खारघर पोलिसांनी सायन-पनवेल मार्गावरील खारघर टोल नाका येथे केली. या कारवाईत पोलिसांनी जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या टेम्पोसह मांस जप्त केले आहे. यावेळी टेम्पो चालक पळून गेल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथून टेम्पो मधून बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची कतल करून त्याचे मांस मुंबई येथे विक्री करण्यासाठी नेण्यात येते असल्याची माहिती एका बातमीदार व्यावसायिकाने मुंबईतील प्राणी कल्याण कायदा निरीक्षण समिती सदस्य आशिष बारीक यांना दिली होती. त्यानंतर आशिष बारीक यांनी आपल्या सहकाऱ्यासह खारघर पोलीस ठाणे गाठून याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर धीरज पाटील आणि त्यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास खारघर टोल नाका येथे पुण्याहून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु केली असताना पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास संशयित टेम्पो खारघर टोल नाका येथे आला. त्यानंतर पोलिसांकडून तपासणीसाठी सदर टेम्पो बाजुला घेण्यात येत असताना टेम्पो चालकाने टेम्पो त्याच ठिकाणी सोडून पलायन केले. पोलिसांनी सदर टेम्पोची तपासणी केली असता, मागील बाजूस काजूचे रिकामे बॉक्स ठेवल्याचे आणि त्याच्या खाली लाकडी फळ्या आणि ताडपत्रीच्या खाली बर्फाच्या तुकड्यांमध्ये जनावरांचे मांस लपवून ठेवण्यात आल्याचे आवळून आले. सदर टेम्पोमध्ये सुमारे ३५० किलो वजनाचे मांस असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी टेम्पोसह त्यातील जनावरांचे मांस जप्त केले. या कारवाई नंतर पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात प्राण्यांचा छळ अधिनियम तसेच इतर कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
Comments