महानगर प्रमुख प्रथमेश सोमण याच्या हस्ते नामफलकाचे उदघाटन तर उप महानगर समन्वयक राहुल गोगटे यांचा पुढाकार
येणाऱ्या काळात अनेकांचे शिवसेनेत होणार पक्षप्रवेश - प्रथमेश सोमण
पनवेल वैभव / प्रतिनिधी :-
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रं १९ मध्ये नामफलकाचे उदघाटन शिवसेना पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या हस्ते आज दि.२३ जाने.रोजी जुने तहसील कार्यालय येथे करण्यात आले. या सामाजिक उपक्रमासाठी उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांनी पुढाकार घेतला.यावेळी मा.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
पूर्वी शिवसेनेच्या फलक संस्कृतीच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक समस्या मांडण्याचे काम होत असे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना त्या-त्या प्रभागातील समस्या कळत असत, अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम हे फलक संस्कृती द्वारे होत असे, तसेच नागरिकांना आपल्या विभागातील माहिती देणाचे काम हे फलकाद्वारे होत असे.
बाळासाहेबांची शिकवण म्हणजे ८०% समाजकारण व २०% राजकारण या धोरणानुसार उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांनी अनेक दिवसांच्या प्रयत्नाने नामफलकाचे अनावरण बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने करून घेतले आहे. नागरिकांच्या समस्या, सामाजिक कार्यक्रम, लोकहिताच्या बातम्या, प्रभागातील उत्सव, त्याचप्रमाणे लेखणीच्या माध्यमातून फलकाद्वारे लोकहीत साधण्याचे उत्तम काम या प्रभागात होणार आहे.
या उदघाटन प्रसंगी बोलताना प्रथमेश सोमण यांनी सांगितले की प्रत्येक विभागात असे भविष्यात आम्ही नामफलक लावणार असून,जनतेचा आवाज बुलंद करून त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम पनवेल महानगरपालिका प्रभागात आम्ही करणार आहोत.
आमच्या सामाजिक कार्याच्या जोरावर भविष्यात आम्ही अनेकांचे शिवसेनेत पक्ष प्रवेश करून घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.
नामफलकाच्या उदघाटन प्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे, शहरप्रमुख प्रसाद सोनवणे, अभिजित साखरे, मंदार काणे, खंडेश धनावडे, सिद्देश खानविलकर, विक्रम पाटणकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.