गाई चोराच्या हातात पडल्या बेड्या, नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष 3 ची कामगिरी....


पो.उपनिरीक्षक सुशील मोरेंकडून तीन गुन्ह्यांचे प्रगटीकरण
पनवेल दि. १९ ( वार्ताहर ) :   नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गोठ्यांमधील गाई चोरून नेऊन कत्तलखान्यात विक्री करणाऱ्या चोराला  गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक 3ने जेरबंद केले. कार्यक्षम ,कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर पोलीस उपनिरीक्षक सुशील बाळकृष्ण मोरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आरोपीला अत्यंत शिताफिने   पकडले. त्याच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
                    नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये गाई चोरीच्या घटना वाढल्या होत्या. तशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद सुद्धा त्या त्या पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली होती. त्यानुसार नवी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष क्रमांक 3ने समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील बाळकृष्ण मोरे यांनी बातमीदाराच्या मार्फत गाई चोरीच्या प्रकरणाचा  छडा लावला. नूर मोहम्मद इसाक कच्ची उर्फ पापा वय 24 वर्षे राहणार अल मारवा बिल्डिंग नंबर 07 कच्ची मोहल्ला पनवेल असे या आरोपीचे नाव आहे. तो दूध नाका ,कल्याण परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर  पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस हवालदार मोरे व पोलीस हवालदार धनवटे यांनी  सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये एन. आर. आय. सागरी पोलीस ठाण्यातील  दोन,पनवेल तालुका पोलीस ठाणे  हद्दीत चार गाई चोरी केल्याचे उघड झाले. एकूण तीन गुन्ह्यांची उकल करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. पुढील तपासाठी आरोपीला पनवेल तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
फोटो- आरोपीसह  पोलिसांचे पथक
Comments