खारघर उष्माघात प्रकरणावर विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा ; महाविकास आघाडीचे राज्यपालांकडे मागणी....
महाविकास आघाडीचे राज्यपालांकडे मागणी....

पनवेल / दि.२४ (संजय कदम) : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात १४ श्रीसदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर व मनाला वेदना देणारी आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रेम करणारे जवळपास २० लाख श्रीसदस्य राज्यभरातून या कार्यक्रमासाठी आले होते. या सोहळ्याचे सरकारला योग्य नियोजन करता आले नाही. सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे १४ श्रीसदस्यांचे मृत्यू (आणखी किती?) झाले आहेत व यापेक्षा जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र सरकार सत्य परिस्थिती लपवत आहे. त्यामुळे या घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी व भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्यासाठी विधीमंडळाचे दोन दिवशीय विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आज पनवेल येथील काँग्रेस भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे राज्यपालांकडे केली आहे. 
 
या पत्रकार परिषदेत यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, कोकण विभाग निरीक्षक रमेश किर, काँग्रेस पनवेल महानगर जिल्हाअध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील,  तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, मा नगरसेवक गणेश कडू, शशिकांत बांदोडकर, शिवदास कांबळे, हेमराज म्हात्रे, दर्शन ठाकूर, वैभव पाटील, लतीफ शेख, शिंदे, महिला आघाडीच्या हेमलता म्हात्रे, शशिकला सिंग आदींसह महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. 
यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश किर यांनी सांगितले कि, खारघरची घटना महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लावणारी आहे. या घटनेतील मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभाराचे उदाहरण आहे. एवढी मोठी घटना झाल्यावर राज्य सरकार मात्र महाराष्ट्र भूषण श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरच जवाबदारी ढकलत आहे. या घटनेकडे राज्य सरकार गांभीर्याने पहात नसल्याचे दिसत आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन सरकार यातून आपली सुटका करुन घेऊ पहात आहे. परंतु हा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत असल्याचे सांगितले. तर  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी सांगितले कि, खारघर घटनेप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, सरकार सत्य परिस्थिती दडवत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी असून सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही घटना झाली आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. या घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी व भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्यासाठी विधीमंडळाचे दोन दिवशीय विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्यपालांनी राज्य सरकारला द्यावेत अशी मागणी केली आहे. तसेच काँग्रेस पनवेल महानगर जिल्हाअध्यक्ष सुदाम पाटील यांनी सांगितले कि, सदर कार्यक्रम संपल्यावर सर्व मान्यवर व्हीआयपी दालनात शाही दावतमध्ये दंग होते तर बाहेर भर उन्हात श्रीसेवक पाण्यावाचून तडफडत होते. अश्या निगरगट्ट शासनाला जनतेनेच जाब विचारणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर मा नगरसेवक गणेश कडू यांनी सुद्धा सध्या सरकारची भूमिकाही निषेधार्य असून शासन आपली जबाबदारी झटकत आहे. मृत १४ श्रीसेवकांसह जखमींना अजून मदत होणे गरजेचे असल्याचे सांगितले. 


फोटो : खारघर दुर्घटनेसंदर्भात महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
Comments