रायगडचा पीवायसी वर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर रोमहर्षक विजय...
कर्णधार निकुंज विठलानी १३९ व हर्ष मोगावीरा ७९ यांची १७४ धावांच्या भागीदारी ठरली महत्वाची...


पनवेल वैभव वृत्तसेवा : - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ गटाच्या आमंत्रितांच्या स्पर्धेतील एच गटातील रायगड विरुद्ध पीवायसी पुणे हा चौथा सामना 19 व 20 मार्च रोजी लांजा रत्नागिरी  येथील खानविलकर क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला.

या सामन्यात रायगड ने पीवायसी विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवला. पहिल्या दिवशी पीवायसीने आपला पहिला डाव 70 षटकात 6 गडी बाद 309 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरादाखल रायगड ने 7 बाद 310 धावा करत पीवायसी पुणेवर पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय संपादन केला.

नाणेफेक जिंकून पीवायसीने प्रथम फलंदाजी स्वीकारली. अमेय भावे व श्रेयश वालेकर यांनी पीवायसीच्या डावाला सुरुवात केली.  सहा षटकांच्या द्रुतगती माऱ्यानंतर आलेल्या संकेत गोवारी या ऑफब्रेक गोलंदाजाने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत आपल्या दुसऱ्याच षटकात अमेय भावेला बाद करत पीवायसीच्या 18 धावसंख्येवर रायगड करता पहिले यश मिळवून दिले. संकेतच्या दुसऱ्या षटकातील उंची दिलेल्या पाचव्या चेंडूवर क्रिज बाहेर  येऊन मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता न आल्याने यष्टीरक्षक विक्रांतने त्याला यष्टिचित केले. नंतर आलेल्या दिव्यांग हिंगणेकर बरोबर श्रेयश वालेकरची जोडी जमली. सावध खेळ करत या जोडीने जेवणाच्या सुट्टीपर्यंत एका गड्याच्या मोबदल्यात 25 षटकात धावसंख्या 86 पर्यंत नेली होती. त्यावेळी दिव्यांग 52 व श्रेयश 32 वर नाबाद होते. जेवणानंतर खेळ सुरू झाल्यावरसुद्धा एका विशिष्ट योजनेनुसार खेळ करत दिव्यांग व श्रेयशने 4.38 च्या सरासरीने  दुसऱ्या गाड्याकरता 201 चेंडूत तब्बल 147 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्याकरता कर्णधार निकुंजने एकुण सहा गोलंदाज वापरुन बघितले. शेवटी हर्ष मोगावीरा या कामचलाऊ ऑफब्रेक गोलंदाजाने दिव्यांगला शॉर्ट थर्डमॅनला उभ्या असलेल्या कर्णधार निकुंजकरवी  झेलबाद करत  दुसरे यश मिळवले. तेव्हा पीवायसीची धावसंख्या होती 2 बाद 165 धावा. चौथ्या क्रमांकावर आलेल्या डावखुऱ्या रोहन दामले 18(29) बरोबर श्रेयशने आणखी 34 धावांची भर घालत संघाची धावसंख्या 199 पर्यंत नेली असताना श्रेयशला, देवांश तांडेलने बाद करण्यात यश मिळवले. मिडविकेटवरील यश मानेने त्याचा झेल घेतला. श्रेयश 83 धावांवर बाद झाला. पीवायसी 3/199.  अनुक्रमे 11, 16 आणि 15 धावांच्या भागीदारी नंतर रोहन, अभिषेक व यश हे सवस्तात व झटपट बाद झाले. चहापानाला पीवायसीची धावसंख्या होती 60 षटकात 6 बाद 234. आदित्य लोंढे 14 व साहिल चौरी 2 धावांवर नाबाद होते. जेवण ते चहापान या दोन तासाच्या सत्रात रायगडने 35 षटकात 4.22 च्या सरासरीने 148 धावा देत पीवायसीचे 5 बळी घेतले.

चहापानानंतरच्या 10 षटकात आदित्य व साहिल यांनी  7.5 च्या सरासरीने नाबाद 75 धावा जोडल्या. सातव्या गड्याकरता त्यांनी एकूण 72 चेंडूत 78 धावांची नाबाद भागीदारी केली. यामध्ये आदित्यचा वाटा 26 चेंडूत नाबाद 11 धावांचा व साहिलचा वाटा 46 चेंडूत अतिआक्रमक अशा नाबाद 62 धावांचा. ज्यामध्ये 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता.

पीवायसीने 70 षटकांच्या खेळानंतर 6 बाद 309 धावसंख्येवर आपला पहीला डाव घोषित करत 90 षटकात 310 धावांचे  आव्हान रायगडला दिले.

दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर रायगडच्या कर्णधार निकुंज विठलानी व विक्रांत जैन या डाव्या-ऊजव्या जोडीने डावाला सुरुवात केली. या दोघांनी 15.1 षटकात आपल्या संघाचे अर्धशतक फलकावर लावले. यामध्ये निकुंजचा नाबाद 22 धावांचा व विक्रांतचा नाबाद 26 धावांचा वाटा होता. 2 धावा अतिरिक्त होत्या. आणखी चार चेंडू नंतर यश माने या ऑफब्रेक गोलंदाजाने विक्रांतला शॉर्ट थर्डमॅनला उभ्या असलेल्या रोहनकडे झेल देण्यास भाग पाडत बाद केले व पीवायसीकरता पहिली सफलता मिळवून दिली. रायगड 15.5 षटकात 1/55. नंतर आलेल्या रितेश तिवारीने निकुंज बरोबर आठ धावांची भागीदारी करत दिवस अखेर पर्यंत धावसंख्या 1 बाद 63 पर्यंत नेली. त्यावेळी निकुंज 58 चेंडूतील 30 धावांवर व रितेश 4 चेंडूतील 1 धावांवर नाबाद होते. पहिल्या डावात आघाडी घेण्याकरता रायगडला अजूनही 72 षटकात 242 धावांची जरुरी होती आणि अजूनही त्यांचे 9 गडी बाकी होते.

दुसऱ्या दिवशी निकुंज आणि रितेशने रायगडच्या डावाला सुरुवात केली. दोन षटकानंतरच रितेश यष्टीरक्षकाकडे झेल देत बाद झाला. त्याला डावखुरा फिरकी गोलंदाज रोहनने बाद केले. नंतर आलेल्या प्रतीक म्हात्रेला झटपट त्रिफळाचीत करत रोहनने 80 धावसंख्येवर रायगडचा तिसरा बळी मिळवला. एक बाजू लावून धरत कर्णधार निकुंज 82 चेंडूत 40 धावांवर नाबाद होता. अजूनही 65 षटकात रायगडला 234 धावांची आवश्यकता होती. कर्णधार निकुंज व हर्ष मोगाविरा या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांची जोडी जमली. त्यांनी संघाचे शतक बत्तीसाव्या षटकात पूर्ण केले, तेव्हा निकुंज 96 चेंडूत 46 व हर्ष 29 चेंडूत 14 धावांवर नाबाद होते. अमेय भावे या मध्यमगती गोलंदाजाला चौकार लगावत निकुंजने आपल्या 50 धावा 102 चेंडूत पूर्ण केल्या. हे त्याचे स्पर्धेतील तिसरे अर्धशतक होते. जेवणाच्या वेळेपर्यंतच्या 38 षटकात, दोघांनी पीवायसीला आणखी कुठलीही सफलता मिळू न देता निग्रहाने खेळत, संघाची धावसंख्या 3 बाद 171 पर्यंत पोहोचवली. त्यावेळी हर्ष 47 धावांवर व कर्णधार निकुंज 82 धावांवर नाबाद होते. 

जेवणानंतर जेव्हा खेळायला सुरुवात झाली तेव्हा चार षटकानंतर  कर्णधार निकुंजने 96 धावसंख्येवरून अभिषेक परमार या डावखुऱ्या चायनामनला लॉंग ऑनला चौकार लगावत या स्पर्धेतील वैयक्तिक व रायगडकडून पहिले शतक पूर्ण केले. तसेच पुढच्याच चेंडूला वाईड लॉंगऑफला लागोपाठ दुसरा चौकार ठोकत ते साजरे देखील केले. या 100 धावा त्याने 180 चेंडूत 15 चौकारांसहीत पूर्ण केल्या. पुढच्याच षटकात हर्ष मोगाविराने देखील आपले स्पर्धेतील दुसरे अर्धशतक 116 चेंडूत 3 चौकारांच्या सहाय्याने पूर्ण केले. यावेळी रायगड, मिळालेले लक्ष पूर्ण करण्याकरता योजनाबद्ध रीतीने आपल्या डावाची उभारणी करताना दिसत होता. ही जोडी फोडण्याकरता पीवायसीच्या कर्णधाराने आठ गोलंदाज वापरून बघितले. शेवटी 51 षटकानंतर, 174 धावांच्या भागीदारीनंतर संघाच्या 254 धावसंख्येवर पीवायसीला ही जोडी फोडण्यात यश आले. 160 चेंडूंचा सामना करत 217 मिनिटे खेळपट्टीवर उभे राहत सहा चौकरांच्या सहाय्याने 79 धावा करणार्‍या हर्ष मोघावीराला रोहन दामलेने पायचीत करत वैयक्तिक तिसरा व संघाकरताचा चौथा बळी मिळवला. 

कर्णधार निकुंज त्यावेळी 132 धावांवर नाबाद होता. अजूनही रायगडला 13.1 षटकात 56 धावांची आवश्यकता होती. पुढे 271 वर मल्हार वंजारी(11) व त्यानंतर लगेचच 274 धावसंख्येवर स्वतः कर्णधार निकुंज 139 (361 मिनीटे, 250 चेंडु, 18 चौ.) परतल्याने रायगडचा धावफलक 83.3 षटकात 6 बाद 274 असा झाला होता. निकुंजची ही खेळी म्हणजे एखाद्या स्त्रीच्या चोखंदळ खरेदी सारखी होती. म्हणजे आपला भाव मिळेपर्यंत वेळेची पर्वा न करता घासाघीस करत दोन-चार दुकानात फिरायचे व तो मिळताच खरेदी करायची. निकुंजनेदेखील चांगल्या चेंडूला मान देत व खराब चेंडूची वाट पाहत त्यावर धावा जमवत व मध्ये मध्ये एक दोन धावा काढत धावफलक हलता ठेवत ही खेळी सजवली. 

अजूनही रायगडला 39 चेंडूत 36 धावांची आवश्यकता होती. सातव्या गड्याच्या रूपात देवांश बरोबर केलेल्या 19 धावांच्या भागीदारी नंतर 293 धावसंख्येवर तहा बाद झाला तेव्हा संघाला अजूनही 23 चेंडू 17 धावांची आवश्यकता होती. देवांश तांडेल बरोबर आलेल्या यश मानेने आठव्या गड्याकरता 18 चेंडूत नाबाद 17 धावांची भागीदारी करत संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. 90 व्या षटकातील उरलेले पाच चेंडू खेळून काढल्यानंतर सामना बंद करण्यात आला व रायगडचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय झाला.
Comments