खारघर टाटा रुग्णालयातील प्रतिक्षा यादी संपणार ....
खारघर टाटा रुग्णालयातील प्रतिक्षा यादी संपणार ....
पनवेल / (प्रतिनिधी) कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी आज खारघर येथे पत्रकार परिषदेत मोदी सरकार तसेच विशेषत्वाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे आभार मानले.   
     यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले कि, कॅन्सर निष्पन्न झालेल्या अनेक लोकांसाठी टाटा हॉस्पिटल हे परवडणाऱ्या दरात उपचार देणारे मुंबई परिसरातील आधाराचे ठिकाण आहे. मात्र तेथील देशभरातून येणारे रुग्ण आणि त्यांची प्रतीक्षा यादी यामुळे  तातडीने उपचाराला विलंब लागत होता आणि त्यामुळे अनेकांचे जीव जात होते. खाजगी ठिकाणी उपचार करण्यासाठी एक तर कर्ज काढावे लागते तर अनेकांना संपत्ती विकून महागड्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक परिवार दुःखाच्या छायेत वावरतात. आता या निर्णयामुळे रुग्णाच्या उपचाराची प्रतिक्षा यादी हि जवळपास संपणार असून वेळेत उपचार होऊन अनेक रुग्णाचे जीव वाचणार आहेत.  त्यामुळे अनेक परिवारांना दिलासा मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने हा निर्णय लाखो परिवारांना दिलासा देणारा ठरणार आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले. 
      कर्करोगावर उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून रुग्ण खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात येत असतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रुग्णालयातील रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढविण्याची मागणी टाटा हॉस्पिटलच्या मागणीनुसार केली होती. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याकडे संवाद साधत पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने टाटा हॉस्पिटल मधील मनुष्यबळाची संख्या तब्बल २४०५ तर रुग्ण खाटांची संख्या ९३० करण्यात येणार असून आमदार महेश बालदी यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. 
   आमदार महेश बालदी यांनी सांगितले कि, खारघर येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सध्या स्थितीत दोन इमारती म्हणजेच रेडिएशन रिसर्च युनिट आणि महिला आणि मुलांचे कर्करोग केंद्र कार्यान्वित केले गेले आहेत, त्यामुळे बेडची संख्या साधारणतः ४०० एवढी आहे. वाढती रुग्णसंख्या आणि आधुनिक तंत्रप्रणाली उपचार लक्षात घेता हेमॅटोलिम्फॉइड कॅन्सर सेंटर, ब्लड कॅन्सरच्या रूग्णांची पूर्तता करणारे देशातील सर्वात मोठे केंद्र या ठिकाणी सन २०२४ च्या अखेरीस कार्यान्वित केले जाणार आहे. त्या अनुषंगाने या रुग्णालयातील १९ ऑपरेशन थियटरमुळे दरवर्षी अंदाजे १० हजार मोठ्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया आणि ५ हजार रूग्णांना रेडिएशन थेरपी,  २५ ते ३० हजार रूग्ण केमोथेरपी उपचार घेऊ शकणार असून जवळपास ०३ लाख २० हजार रुग्ण औषोधोपचार घेऊ शकणार आहेत. त्यामुळे मनुष्यबळाचा विचार केला असता या ठिकाणी सध्यस्थितीत सर्व श्रेणीतील एकूण १०६७ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये आता वैद्यकीय, नर्सिंग, तंत्रज्ञ, सुरक्षा, हाऊसकीपिंग आणि प्रशासकीय अशा सर्व श्रेणींमध्ये भर पडून ती संख्या २४०५ कर्मचाऱ्यांची होणार आहे.  त्यामुळे कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी मोठी मदत होणार असून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.त्यामुळे हे सर्व परिवार मोदी सरकारला दुवा देणार आहेत, असेही त्यांनी अधोरेखित केले. 


 कोट-
कर्करोग रुग्णांची परिस्थिती आणि उपचार या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि मी टाटा हॉस्पिटलचे डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने नोव्हेंबर २०२२ मध्ये या संदर्भात आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वाढीव रुग्ण बेड आणि आणि मनुष्यबळाची मागणी केली होती. त्यानुसार अवघ्या तीन महिन्यात तातडीने निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्य गरिबाला आणि समाजाला न्याय देण्याचे काम करीत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून या निर्णयाबद्दल आम्ही आनंदीत झालो असून आभार व्यक्त करतो. - आमदार महेश बालदी
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image