मराठी नाटकांच्या भाड्यामध्ये ७५% सवलतीच्या निर्णयाचे भाजपच्यावतीने स्वागत ; आयुक्त गणेश देशमुख यांचे मानले आभार...
आयुक्त गणेश देशमुख यांचे मानले आभार...
पनवेल / (प्रतिनिधी) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांच्या भाड्यामध्ये ७५ % सवलतीच्या निर्णयाचे भाजपच्यावतीने स्वागत करण्यात आले असून या निर्णयाबद्दल पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांचे आभार मानण्यात आले आहेत. आभार पत्र देताना भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, श्यामनाथ पुंडे, स्मिता गांधी, गणेश जगताप आदी कला सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. 

या संदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांना भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेलच्या वतीने आभार पत्र देण्यात आले आहे. या आभारपत्रात म्हंटले आहे कि, कोरोना संसर्गानंतर मुंबईपासून जवळ असणाऱ्या मेट्रोपॉलिटिन शहरांमध्ये पनवेल हे नाट्य कलावतांसाठी मध्यवर्ती ठिकाण बनले आहे. कोरोना साथरोगानंतर मराठी नाट्य व्यवसायावर आलेली मरगळ दूर करण्यासाठी कलाक्षेत्रातून मराठी नाट्य व्यवसायाला बळ मिळण्यासाठी भाडेदरात सवलत मिळण्याची मागणी केली जात होती. ह्या मागणीचा विचार करत तसेच पनवेलकरांची सांस्कृतिक भूक भागावी व उत्तमोत्तम नाट्य कलाकृती पनवेलकर रसिकांना बघायला मिळाव्यात ह्या हेतूने नुकत्याच पार पडलेल्या प्रशासकीय बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने सुचविलेल्या ७५ टक्के भाडे सवलतीच्या ठरावाला मंजुरी दिली त्या बद्दल आपले मनस्वी आभार. व्यवस्थापन, विज आणि मनुष्यबळासाठी होणारा खर्च लक्षात घेता हा निर्णय पालिकेला परवडणारा नाही. तरीही पनवेलकरांची नाट्यक्षेत्राविषयी असलेली ओढ लक्षात घेऊन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मराठी नाटकांना आपण ७५% भाडे सवलत देण्याचा निर्णय घेतला आहेत. आणि हा थोड्याथोडक्या काळासाठी नाही तर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत हा लागू असणार आहे. या नाट्यक्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत आपले पुनःश्च आभार व्यक्त करतो. आपण घेतलेल्या ह्या निर्णयाचा कळत नकळत अनेक कुटुंबांना फायदा होणार आहे. आपण घेतलेल्या ह्या निर्णयाने कलाक्षेत्राविषयी असलेली आपली ओढ ही अधोरेखित होत आहे, असेही या आभारपत्रात नमूद करून आभार मानण्यात आले आहेत.
Comments