मालवण येथे रंगणार १२ वी खुली राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा ....

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिपक परब यांची माहिती
 
मुंबई / नारायण सावंत  : - महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या वतीने बारावी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा शनिवार दिनांक १७ आणि १८ डिसेंबर  या दोन दिवशी मालवण चिवला बीचच्या समुद्रात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिपक परब आणि सचिव राजेंद्र पालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 
 
या स्पर्धेत २६ जिल्ह्यातून पंधराशे स्पर्धक सहभागी होणार आहेत. राज्यभरात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या जलतरण स्पर्धेसाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेच्या नियोजनाची बैठक सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिपक परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राजेंद्र पालकर, उपाध्यक्ष बाबा परब, निल लब्दे, डॉ. राहुल पंतवालावलकर, सुनील मयेकर, युसूफ चुडेसरा, राकेश पवार आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
डॉ दीपक परब आणि राजेंद्र पालकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, २००९ पासून महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही सागरी जलतरण स्पर्धा होत आहे. या स्पर्धेने गेल्या दहा वर्षात दहा हजार स्पर्धकांचा टप्पा पार केला आहे.
स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला फिनिशर मेडल, सहभाग प्रमाणपत्र यासह प्रत्येक ग्रुपमधील पहिल्या १० विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय या स्वरूपात मेडल, रोख स्वरूपात बक्षिसे, टी शर्ट, प्रमाणपत्र, नॅपकीन, बॅग, वॉटरबॉटल आदी भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना तैनात असणार असल्याची माहिती डॉ दीपक परब यांनी दिली आहे 
डॉ परब यांनी पुढे म्हटले आहे की, 
स्पर्धेसाठी मालवण येणाऱ्या स्पर्धकांचे रजिस्ट्रेशन १६ डिसेंबर रोजी मामा वररेकर नाट्यगृह येथे होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १७ डिसेंबर रोजी ५०० मीटर, १ किलोमीटर, २ किलोमीटर या सर्व ग्रुपची स्पर्धा व पारितोषिक वितरण तसेच १८ डिसेंबर रोजी ३ व ५ किलोमीटर स्पर्धा होणार आहे. त्याचेही रजिस्ट्रेशन मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. स्पर्धा आयोजनासाठी राज्य शासन, मालवण नगरपरिषद, सामाजिक कार्यकर्ते, आजी, माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व मालवणवासीय नागरिक, स्थानिक मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक या सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी होत आली आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्पर्धकांनाही जलतरण स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठ उपलब्ध होत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनीही सहभाग घ्यावा असे आवाहन अध्यक्ष डॉ दीपक परब यांनी केले आहे.
Comments