भाजपकडून बंडखोर उमेदवारांचे सहा वर्षांसाठी निलंबन
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या खारघरमधील अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल निलेश बाविस्कर, गीता चौधरी व कोमल शिंदे- दहाडे यांचे भारतीय जनता पार्टीमधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. संबंधितांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवत बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टी ही शिस्तबद्ध संघटना असून, पक्षाच्या निर्णयांचे पालन करणे प्रत्येक कार्यकर्त्याला बंधनकारक आहे. मात्र निलेश बाविस्कर, गीता चौधरी आणि कोमल शिंदे-दहाडे यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी निर्णय घेत भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात आपले उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षशिस्तीचा भंग आणि बंडखोरी केली आहे. त्यामुळे निलेश बाविस्कर, गीता चौधरी व कोमल शिंदे-दहाडे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.