पिल्लई कॉलेज आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम..
 विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम...

पनवेल दि २० (वार्ताहर) : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. पनवेल शहरातील विविध चौकांमध्ये सकाळी अत्यंत वर्दळीच्या वेळेत काही किशोरवयीन विद्यार्थ्यांनी कचरा जमा करून हा परिसर स्वच्छ केला. पिल्लई कॉलेज आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवली.
पनवेल शहरात सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीची रेलचेल सुरू आहे. पनवेल शहरात नागरिकांसोबत वाहनांचीही गर्दी आहे. सकाळी नऊ वाजता गर्दीला सुरुवात होत असतानाच बारावीचे २५ विद्यार्थी रस्त्यावर पडलेला कचरा हाताने जमा करीत होते. सकाळी अत्यंत वर्दळीच्या वेळी विद्यार्थी कचरा जमा करत असल्याचे पाहून रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक आश्चर्यचकीत होऊन चौकशी करीत होते. परंतु ही तरुण मुले कोणतीही चिंता न करता स्वच्छतेचे काम करीत होती. पनवेलशहरातील हुतात्मा गार्डन, शिवाजी चौक, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, लेंडाळे तलाव आदी परिसरात या विद्यार्थ्यांनी सकाळी १२ वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबवली. नेहरू युवा केंद्राच्या रायगड जिल्हा विभागाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेत नेहरू युवा केंद्राचे राज्य संघटक प्रकाश कुमार मनोरे यांच्यासह रायगड विभागाचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रोतेला, पिल्लई कॉलेजच्या डॉ. किरण देशमुख, इन्फिनिटी फाऊंडेशनचे सदस्य आणि राष्ट्रीय युथ स्वयंसेवक आयुफ आकुला आदी मान्यवर या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. महाराष्ट्रभर ३१ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबविली जाणार असून चार लाख किलो कचरा जमा करण्याचे लक्ष्य असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले. पनवेलमध्ये केलेल्या स्वच्छता मोहिमेत जमा झालेला कचरा पनवेल महापालिकेच्या घंटागाडीकडे सुपूर्द करण्यात आला.


फोटो : पिल्लई कॉलेज आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम
Comments