प्रवासी संघ आणि स्थानिक सल्लागार समितीच्या आणखीन एका मागणीस आले यश...
प्रवासी संघ आणि स्थानिक सल्लागार समितीच्या आणखीन एका मागणीस आले यश...
पनवेल वैभव वृत्तसेवा : -  
करोना काळात दिवा – पेण – दिवा मेमू गाड्यांची सेवा बंद होती. कमी झालेली रुग्णसंख्या आणि शिथिल झालेले निर्बंध लक्षात घेऊन ऑक्टोबर २०२१ पासून या मार्गावर चार मेमू गाड्यांच्या फेर्‍या सुरू करण्यात आल्या होत्या. आता आणखी चार फेर्‍यांची  भर पडली आहे. शनिवार, रविवार वगळता उर्वरित पाच दिवस मेमू धावणार आहे. या मार्गावर प्रवास करणारे चाकरमानी आणि विद्यार्थी यांची मागणी लक्षात घेता स्थानक सल्लागार समिती आणि प्रवासी संघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सदर मागणी लावून धरली होती.

मेमू गाड्यांच्या फेर्‍या कमी असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रेल्वेच्या वेळेत न गेल्यास लांबणीचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मेमू गाड्यांच्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवासी संघ आणि स्थानक सल्लागार समितीकडून करण्यात आली होती. त्यानूसार दिवा – पेण – दिवा मार्गावर मेमू गाड्यांच्या आणखी फेर्‍या वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या मार्गावर 5 जुलैपासून चार फेर्‍या होतील, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

दिव्याहून पनवेलसाठी सकाळी ९.४० वाजता, पेणहून दिव्यासाठी सकाळी पावणेसात वाजता, दिव्याहून पेणसाठी रात्री ७.५० वाजता आणि पेणहून दिव्यासाठी सायंकाळी ६.०५ वाजता गाडी सोडण्यात येणार आहे. दातिवली, निळजे, तळोजे पाचंद, नावाडे रोड, कळंबोली रोड, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटे, जिते, हमरापूर येथे गाड्यांना थांबा असेल. या गाड्या बारा डब्यांच्या असतील.
        याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉक्टर भक्तीकुमार दवे म्हणाले की, मेमू गाड्या शनिवार-रविवार सुद्धा चालविल्या गेल्या पाहिजेत ही देखील आमची मागणी आहे. तूर्तास दिवा पेण मार्गावर गाड्या सुरू झाल्याचे समाधान असले तरी देखील आमची मागणी अंशतः पूर्ण झाली आहे. शनिवार व रविवार देखील या मार्गावर प्रवाशांचा राबता असतो. या विभागात पाऊस प्रचंड पडतो, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात महामार्गाचे अत्यंत नुकसान होते. अशा वेळेस रस्त्याने प्रवास करणे जिकरीचे असते त्यामुळे रेल्वे प्रवास हाच सर्वोत्तम पर्याय प्रवाशांच्या पुढे असतो. त्यामुळे सदरची सेवा शनिवार रविवार देखील सुरू राहील यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.
Comments