रोहा रेल्वे स्थानकातील गोंधळाबद्दल दखल घेत डी आर एम यांनी व्यक्त केली दिलगिरी..


अभिजीत पांडुरंग पाटील यांच्या तक्रारीची घेतली दखल, पुन्हा असले प्रकार न होण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही

पनवेल / वार्ताहर : -  मे महिन्यात दुसऱ्या रविवारी रोहा रेल्वे स्थानकात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निर्धारित वेळेवरती पोहोचणार्‍या एक्सप्रेस गाडी ने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना तिकिटे काढताना प्रचंड गडबड गोंधळाला सामोरे जावे लागले. एकुलत्या एक तिकीट बुकिंग विंडो वरील कर्मचाऱ्यास तिकीट देण्याच्या प्रक्रियेबाबत फारसे ज्ञान नसल्याने त्याचा गोंधळ उडाला होता. गाडीची वेळ जवळ येऊन ठेपली, तिकिटाची रांग लांबच लांब होत राहिली होती. प्रवाशांनी आक्रमक होत सुपरवायझर कडे तक्रार केली असता तुम्ही सगळ्यांनी विना तिकीट प्रवास करा असा अतार्किक सल्ला त्यांनी प्रवाशांना दिला.
       पत्रकार किरण बाथम यांनी झाला प्रकार मोबाईल मध्ये शूट करून सेंट्रल रेल्वेच्या स्थानक सल्लागार समितीचे सदस्य पत्रकार मंदार मधुकर दोंदे यांना याबाबत सूचित केले. मंदार दोंदे यांनी त्वरित झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टींग कमिटीचे सन्माननीय सदस्य अभिजीत पांडुरंग पाटील यांची भेट घेऊन सदरचा प्रकार गंभीर असल्याचे सांगितले. यामध्ये प्रवाशांना पुढील प्रवासात जबरदस्त दंडात्मक कारवाईला सामोरे  जावे लागू शकले असते. रेल्वे प्रशासनाचा रेवेन्यू बुडाला याकडे देखील गांभीर्याने बघावे लागेल. तसेच प्रशिक्षित कर्मचारी तिकीट बुकिंग सारख्या महत्वाच्या ठिकाणी जर नियुक्त करू शकत नसतील तर हा दोष नेमका कोणाचा आहे? हे शोधणे देखील गरजेचे आहे. अशा मुद्द्यांवरती अभिजीत पांडुरंग पाटील आणि मंदार दोंदे यांनी चर्चा केल्यानंतर अभिजित पाटील यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील सर व्यवस्थापकांना पत्र लिहून सदरची गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
    नुकतेच रेल्वे चे डीव्हिजनल मॅनेजर यांनी अभिजीत पाटील यांना पत्र लिहून सदर घटनेची गांभीर्याने नोंद घेतली असल्याचे कळवले. संबंधित खाते या प्रकारावर कारवाई करणार असल्याचे त्यांनी कळविले आहे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
Comments