रयत शिक्षण संस्थेची डिजिटल शिक्षणात सरस कामगिरी - डॉ.अनिल पाटील
सातारा (हरेश साठे) : - कोरोनाने शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात आव्हाने निर्माण केली, असे असले तरी रयत शिक्षण संस्थेने या आव्हानांना सामोरे जाताना डिजिटल शिक्षणात सरस कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या वतीने गुणवंत रयत सेवकांचा आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तिका प्रकाशन समारंभ सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सभागृहात संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.०८)संपन्न झाला. त्यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ.विठ्ठल शिवणकर, माध्यमिक विभागाचे सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य एम.डी. शेख, दक्षिण विभागीय अध्यक्ष माधव मोहिते, मध्य विभागाचे अध्यक्ष संजीव पाटील, कर्मवीर प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक आर.के.शिंदे, श्री.डोंगरे, यांच्यासह पदाधिकारी व रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या रयत सेवकांचा 'निष्ठावान गुणी रयत सेवक' पुरस्काराने गौरव, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा असलेले मेडल देऊन सन्मान, त्याचबरोबर आधुनिक शिक्षा शिल्पी, रयत शिक्षण पत्रिका, शालेय स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त सहज सोप्या क्लुप्त्या आणि विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तिका, या चार पुस्तिकांचे प्रकाशन डॉ.अनिल पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की, कोरोनाच्या कारणामुळे दोन वर्षे हा कार्यक्रम घेता आला नाही.कोरोना काळात अनेक आव्हानं सर्वच क्षेत्रात निर्माण झाली. पण हे होत असताना शिक्षण प्रणालीमध्ये मोठे बदल झाले आहेत ते विशेषतः ऑनलाईन शिक्षण पद्धतीने. या कठीण परिस्थितीत शिक्षणाचे काम कसे द्यायचे हा विचार घोंगावत होता. पण विचार ऑनलाईन पद्धतीवर भर देण्यात उपयोगी आणला. आणि तशी शिक्षकांची टीम आणि त्या अनुषंगाने टाईम बॉम्ब प्रणाली प्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली, तब्बल साडे सहा हजार व्हाट्सएप ग्रुप तयार केले, संबंधित शिक्षकांनी अभ्यास संदर्भात लिंक निर्माण केल्या आणि विद्यार्थ्यांना प्रसारित करून शिक्षणाचे काम अविरतपणे करता आले, असे डॉ.अनिल पाटील यांनी सांगून डिजिटल शिक्षणाचा रयत शिक्षण संस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा झाला, असल्याचे अधोरेखित केले. येत्या काळात डिजिटल प्रणालीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि त्या अनुषंगाने स्पर्धांमध्ये स्पर्धा होणार आहेत त्यामुळे त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांला मार्गदर्शक दिशा देण्याची भूमिका पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.