जुने कपडे विकण्यासाठी गमावले ८.५० लाख रुपये...
जुने कपडे विकण्यासाठी गमावले ८.५० लाख रुपये

पनवेल दि. २९ (वार्ताहर): ओएलएक्सच्या माध्यमातून जुने कपडे विकण्याच्या प्रयत्नात महिलेची ऑनलाईन फसवणूक झाली आहे, कपडे विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका उच्चशिक्षित महिलेला अज्ञात सायबर चोरट्याने तब्बल ८ लाख ५ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे..
                          सदर प्रकरणात फसवणूक झालेली ३७ वर्षीय महिला सध्या खारघर येथे वडीलांकडे राहण्यास आहे. सदर महिला उच्चशिक्षित असून ती एका कंपनीत सिनीयर कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या महिलेने आपले जुने कपडे विकण्यासाठी ओएलएक्सवर त्याचे फोटो अपलोड केले होते. त्यानंतर काही दिवसातच एका सायबर चोरट्याने या महिलेला संपर्क साधून त्याचे अंधेरी येथे फर्निचर आणी जुन्या कपड्यांचे दुकान असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडे असलेले सर्व कपडे विकत घेण्याची तयारी दर्शवून त्याने त्यांच्याकडील कपड्यांचे फोटो त्याच्या मोबाईलवर पाठविण्यास सांगितले. त्यानुसार या महिलेने त्याच्या मोबाईलवर आपल्या जुन्या कपडयाचे फोटो व्हॉटस्अॅप वरुन पाठवून दिले.
त्यानंतर सायबर चोरट्याने कपडे घेण्यासाठी मुलाला त्यांच्या घरी पाठविण्याचा आणि पेटीएमद्वारे पैसे पाठविण्याचा बहाणा केला. सुरुवातीला त्याने सदर महिलेला २ रुपयांचा एक क्युआर कोड पाठवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सायबर चोरट्याने पाठविलेले क्युआर कोड या महिलेने स्कॅन केले असता, त्याच्याकडून पैसे येण्याऐवजी तिच्या खात्यातून पैसे जाण्यास सुरुवात झाली. अशा पध्दतीने सायबर चोरट्याने या महिलेला ११ वेळा क्युआर कोड पाठवून ते स्कॅन करण्यास भाग पाडून तिच्या खात्यातून तब्बल ८ लाख ५० हजार रुपये उकळले. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने आपल्या बँकेच्या कस्टमर केअरला संपर्क साधून आपले बँक खाते ब्लॉक करुन घेतले. तसेच खारघर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
Comments