पनवेल महापालिकेच्या ऑनलाईन मॅरेज रजिस्ट्रेशन पोर्टलला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल दि. ०९ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील चारही प्रभागातील नागरिकांना दि.1 एप्रिल पासून ऑनलाईन पध्दतीने विवाह नोंदणी करता येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने 'मॅरेज रजिस्ट्रेशन पोर्टल' सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलला अर्जदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
यापूर्वीच्या प्रक्रियेत अर्जदाराला किमान पाच ते सहा खेटे या विवाह नोंदणीच्या प्रक्रियेसाठी मारावे लागत होते.मात्र पालिकेने राबविलेल्या या ऑनलाईन प्रक्रियेमुळे केवळ एकदाच विवाह नोंदणीसाठी अर्जदार तसेच त्यांच्या साक्षीदारांसह उपस्थित रहावे लागणार आहे.चार प्रभागात केलेल्या नोंदणीत पनवेल 35,कामोठे 13,कळंबोली 9,खारघर 9 आदींचा समावेश आहे. 'मॅरेज रजिस्ट्रेशन पोर्टल'वर जाऊन इच्छुक नागरिकांनी http://pmc.marriagepermission.com आपली सर्व माहीती भरावयाची आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून या माहीतीची छाननी केली जाईल. दर सोमवारी आणि गुरुवारी १०-१२ यावेळेत या नोंदणी इच्छुक नागरिकांना बोलण्यात येईल. दिलेल्या तारखेस येताना नागरिकांनी आपल्या मूळ कागदपत्रांचा छायांकीत प्रत असलेला एक सेट सोबत घेऊन यावे. त्याचवेळी त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल.
महापालिकेच्या मुख्यालय सोडून खारघर'अ', कळंबोली 'ब', कामोठे'क', पनवेल'ड' या प्रभाग कार्यालयात नागरिकांसाठी ही विशेष सुविधा देण्यात आली अशी माहिती पालिका उपायुक्त सचिन पवार यांनी दिली. नागरिकांना वारंवार विवाह नोंदणीसाठी पालिकेत खेटे मारावे लागू नये म्हणुन हे ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले असून नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत असल्याचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.